06 March 2021

News Flash

‘सरल’मध्ये आता वयाचा तिढा

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका ‘क्लिक’सरशी संगणकावर उपलब्ध व्हावी म्हणून राबविण्यात येणाऱ्या ‘सरल’ उपक्रमात केवळ १७ वर्षे वयापर्यंतच्याच विद्यार्थ्यांची माहिती स्वीकारण्याची सोय आहे.

| August 14, 2015 05:30 am

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका ‘क्लिक’सरशी संगणकावर उपलब्ध व्हावी म्हणून राबविण्यात येणाऱ्या ‘सरल’ उपक्रमात केवळ १७ वर्षे वयापर्यंतच्याच विद्यार्थ्यांची माहिती स्वीकारण्याची सोय आहे. रात्रशाळेत तर अशी मोठय़ा वयाची बरीच मुले असतात. त्यामुळे मुंबईतील तब्बल १५० रात्रशाळांबरोबरच ज्या शाळांमध्ये एखाद्दुसरा जरी विद्यार्थी अधिक वयाचा असेल अशा शाळांसाठी ही माहिती भरणे डोकेदुखी ठरते आहे.शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीच्या विविध उपक्रमांसाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगटापासून ते त्यांच्या आई-वडिलांच्या उत्पन्नापर्यंतची माहिती ‘सिस्टेमॅटिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉम्र्स फॉर अ‍ॅचििव्हग लर्निग बाय स्टुडंट्स’ अर्थात ‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत भरून द्यायची आहे. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती आता वाढविण्यात आली असली तरी वयाबाबत असलेला गोंधळ अद्याप दूर व्हायचा आहे.केवळ विद्यार्थ्यांची नव्हे तर शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही ही माहिती भरून द्यायची आहे. परंतु प्रत्येकाची तब्बल ८० प्रकारची माहिती भरण्याकरिता शिक्षकांना एक ते दीड तास लागतो आहे. त्यामुळे शाळांमधील अध्यापनाचे काम ठप्प झाले आहे. त्यातच सव्‍‌र्हर काम न करणे, शाळांमध्ये संगणक व इंटरनेट सुविधेचा अभाव यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी सरलचे काम एक आव्हान ठरते आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींमुळे मुंबईत शिक्षण संचालक (माध्यमिक) एन. के. जरग यांनी बुधवारी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी, अधिकारी आदींची बैठक मुंबईत घेतली. त्यावेळी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी वयाच्या अडचणीचा मुद्दा बैठकीत मांडला.सरलच्या संगणक प्रणालीत केवळ १७ वर्षांखालील मुलांचीच माहिती स्वीकारली जात आहे. त्यामुळे १८ आणि त्यापुढील वय असलेल्या मुलांची माहितीच भरता येत नाही, असे वरळीतील आगरकर रात्रशाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील यांनी सांगितले. रात्रशाळांमध्ये तर १८ आणि त्यापुढील वयाची मुले मोठय़ा संख्येने असतात. प्रत्येक शाळेत अशी किमान सात-आठ मुले तरी असतातच. त्यामुळे त्यांची माहिती कशी भरायची असा या शाळांसमोर प्रश्न आहे.मुंबईत तर हा प्रश्न अधिकच गंभीर होतो. कारण मुंबईत रात्रशाळांची संख्या सर्वात जास्त म्हणजे सुमारे १५०च्या आसपास आहे. परंतु वयाबाबतच्या अटीमुळे काही मुलांची माहिती भरणे शाळांना कठीण झाले आहे. शाळांची ही अडचण लक्षात घेऊन जरग यांनी त्यानुसार संगणक प्रणालीत बदल करण्याचे आश्वासन दिले आहे, असे बोरनारे यांनी सांगितले.
मुंबईत १२ ते १५ सप्टेंबर रोजी ‘सरल’ मोहीम
राज्यभरातून एकाच वेळी माहिती भरण्याचे काम होते आहे. त्यामुळे सरलच्या सव्‍‌र्हरवर ताण येऊन माहिती भरण्यासाठीची पानेच संगणकावर उघडली जात नाहीत. त्यामुळे आता माहिती भरण्याचे काम विभागवार टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागवार वेळापत्रक नेमून देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान माहिती भरण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 5:30 am

Web Title: night school most headaches
Next Stories
1 पनवेल-चिपळूण गाडी दिव्याहून सोडा
2 तांत्रिक करामतीत स्मार्ट गुन्हेगार चार पावले पुढेच!
3 रुग्णांची जीवनशैली सुधारण्याचे आयुर्वेदिक प्रयत्न ‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ पुस्तकाचे प्रकाशन
Just Now!
X