– दोन शाळांचा १०० टक्के निकाल
पटपडताळणी अभियानात विद्यार्थिसंख्या कमी आढळून आल्यामुळे मुंबईतील काही रात्रशाळांच्या अस्तित्वावरच घाला आला असताना दोन रात्रशाळांनी दहावीत १०० टक्के निकाल नोंदवत ‘हम किसी से कम नहीं’ असे दाखवून दिले आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर घेतलेल्या विशेष मेहनतीमुळेच या शाळांना हे ‘शत प्रतिशत’ यश मिळविता आले आहे.
रात्रशाळांकडे पाहण्याचा सरकारचा उदासीन दृष्टिकोन, तिथल्या गरीब व कष्टकरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या मर्यादा, शाळांमधील साधनसुविधांचा अभाव अशा परिस्थितीतही वरळीच्या ‘आगरकर रात्र विद्यालय’ आणि ‘मराठा नाइट स्कूल’ या शाळांचे दहावीला सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आगरकरमधून दहावीला बसलेल्या २७ पैकी १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर मराठा नाइट स्कूलमधून दहावीची परीक्षा दिलेल्या १२ पैकी ७ ते ८ विद्यार्थी अंध होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘आमच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी घरकाम, रस्त्यावर पुस्तकविक्री करणारे, कारखान्यातील अल्पवयीन मजूर आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या मर्यादा ओळखून आम्ही नववीची परीक्षा झाल्यावर लगेचच त्यांचे दहावीचे वर्ग सुरू करतो. १ ते ३० एप्रिल आणि त्यानंतर १ जूनपासून ते पुढे परीक्षा होईपर्यंत हे वर्ग चालतात. रविवारी सुट्टीच्या सकाळी ८ ते दुपारी १.३० असे अतिरिक्त वर्ग घेऊन त्यांचे शंकानिरसन करणे, प्रश्नपत्रिका सोडवून घेणे या गोष्टी  केल्या.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विषयाच्या किमान तीन प्रश्नपत्रिका आम्ही मुलांकडून सोडवून घेतल्या होत्या,’ असे आगरकरचे मुख्याध्यापक अनंत पाटील यांनी सांगितले. आमच्या शाळेतील एकही विद्यार्थी क्लासला जात नाही, असे पाटील सर अभिमानाने नमूद करतात. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषणकौशल्यावर शाळा चांगलीच मेहनत घेते. आमच्या या प्रयत्नांना ‘मासूम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या मदतीची खूप साथ लाभली, याचाही आवर्जून उल्लेख केला.
असेही ‘टायअप’
रात्रशाळांना आपला निकाल उंचावण्यास ‘मासूम’ या स्वयंसेवी संस्थेचा चांगलाच उपयोग होत आहे. मुंबईतील १५ रात्रशाळांमध्ये मासूमचे काम आहे. येथील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस नाश्ता पुरविण्याबरोबरच मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ शिक्षक, शैक्षणिक साहित्य, नोट्स, अभ्यासाला पूरक पुस्तके आदी मदत मासूम या शाळांना पुरविते. याशिवाय गरज भासल्यास एलइडी, लॅपटॉप, प्रयोगशाळा इत्यादी सुविधा मासूम उपलब्ध करून देते. आता संस्थेने आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांची दहावीनंतरची आयुष्याची घडी नीट बसावी यासाठी करिअरविषयक मार्गदर्शनही पुरविण्यावर भर दिला आहे. रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी असा आमचा प्रयत्न असतो. तसेच या वर्षी आम्ही गरीब व शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांनी मोठय़ा संख्येने शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी विद्यार्थी नोंदणी अभियान राबविणार आहोत, असे मासूमच्या संस्थापक निकिता केतकर यांनी सांगितले.

अनुराधाची कामगिरी
आगरकरच्या अनुराधा चौहान या विद्यार्थिनीने दहावीला ९१ टक्के गुणांची कमाई करीत शाळेचे नाव उंचावले आहे. २२ वर्षांच्या अनुराधाला तीन वर्षांची मुलगीही आहे. नववीला शाळा सोडून लग्न केल्याने तिच्या शिक्षणात तब्बल सहा वर्षांचा खंड पडला होता.  लग्नानंतर थोडय़ाच वर्षांत तिच्या पतीचे अकाली निधन झाले. अनुराधा वरळीला आई-वडिलांकडे राहायला आली. माहेरी आल्यानंतर तिने उदरनिर्वाहासाठी एका ११ वर्षांच्या मुलीला सांभाळण्याचे काम धरले. सकाळी ८.३० ते ७ असे काम करून शिकणाऱ्या अनुराधाला सायंकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या शाळेत पहिल्या-दुसऱ्या तासाला हजेरी लावणे कधीच जमले नाही.  तिची अडचण समजून शाळेने सुट्टीच्या दिवसात तिचा मागे पडलेला अभ्यास भरून काढला. तिच्या मेहनतीचे  शिक्षकांना फारच कौतुक आहे. शाळेचा निरोप घेताना तिने केलेले इंग्रजीतील भाषण आजही इथल्या शिक्षकांना स्मरते. अनुराधाला अभियांत्रिकी शाखेला जायचे आहे. पण त्यासाठी लागणारे शुल्क भरणे शक्य नसल्याने तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शिक्षिका होण्याचे ठरविले आहे.