कोणत्याही परिस्थितीत या वर्षी निळवंडेचे काम पूर्ण करावे लागेल. धरणाचे दरवाजे बसविण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची मागणी असली तरी यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आणि न्यायालयात दाखल खटल्यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ४७व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि कारखान्याने बांधलेल्या अतिथिगृहाचे उद्घाटन मंगळवारी थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रामनाथ राहणे, प्रेमानंद रूपवते, दिलीप पुंड, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, मी औरंगाबादचा पालकमंत्री असलो तरी संगमनेरचाही लोकप्रतिनिधी आहे. कोणावरही अन्याय होईल अशी आपली भूमिका नाही. गेली दोन वर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या औरंगाबादला पिण्याच्या पाण्याची गरज म्हणून नगर, नाशिकमधून पाणी सोडले. आता मात्र जायकवाडीत ३३ टक्केपाणीसाठा आहे. तरीही समन्यायी पाण्याचा मुद्दा उपस्थित करून आणखी पाण्याची मागणी करण्यात आली. माझी भूमिका यासंदर्भात स्पष्ट असल्याचे औरंगाबादमध्येही सांगितले असून त्यात कोणतीही संदिग्धता नाही. औरंगाबादमधून लढण्याच्या संदर्भात केवळ अफवा पसरविल्या जात असून, इतर संस्थांप्रमाणे अद्याप लोकसभा, विधानसभेत महिला आरक्षण आले नसल्याचे स्पष्ट करत आपल्याविषयी व कारखान्याच्या कामकाजासंदर्भातील अफवा नियोजनबद्धरीत्या पसरविल्या गेल्या आहेत. याची उगमस्थाने कार्यकर्त्यांनी ओळखली पाहिजेत. काही जमत नसले की अफवा पसरविणे असा काहींचा उद्योग असल्याची टीका त्यांनी केली.
आणखी तीन वर्षांनी कारखाना सुवर्णमहोत्सव साजरा करेल. आत्तापेक्षाही सरस कामगिरी पुढच्या तीन वर्षांत व्हायला हवी. सहकारातील सर्वाधिक सरस कामगिरी म्हणून आपल्याकडे संपूर्ण राज्याने चमकून पाहिले पाहिजे. सहकाराचा एक नवा वस्तुपाठ यातून दिसेल अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली. आमदार डॉ. सुधीर तांबे, माधव कानवडे यांचीही या वेळी भाषण झाली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक अनिल िशदे यांनी केले. तर नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले.