ग्राहक पंचायतीच्या लढय़ास यश
दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील निंबाळकरवाडीतील रहिवाशांच्या घरात रात्रीही वीजपुरवठा करण्यात यावा, यासाठी जिल्हा ग्राहक पंचायतीने सुरू केलेल्या लढय़ास अखेर यश आले असून, मुख्य अभियंत्यांच्या आदेशानंतर निंबाळकरवाडीतील सर्व घरांमध्ये नवीन वीजजोडणीसह रात्रीही वीजपुरवठा सुरू झाला आहे.
निंबाळकरवाडीत १२ वर्षांपासून फक्त दिवसा वीजपुरवठा करण्यात येत होता. या भागातील गरिबांना शासनाने घरे बांधून दिली, परंतु त्यांना नवीन वीजजोडणी मिळत नव्हती, तसेच रात्री वीजपुरवठाही करण्यात येत नव्हता. अशा प्रसंगी शिवनईचे सरपंच धोंडीराम निंबाळकर व स्थानिक कार्यकर्ते कृष्णा गडकरी यांनी पुढाकार घेतला.
आदिवासींना नवीन वीजजोडणी द्यावी, तसेच रात्रीचा वीजपुरवठा करण्यात यावा म्हणून नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडे गाऱ्हाणे मांडले. ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, अनिल नांदोडे, सिद्धार्थ सोनी यांनी मुख्य अभियंत्यांची भेट घेत त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी त्वरित वस्तीवर सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडणी द्यावी, तसेच रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे साहाय्यक अभियंत्यांनी कार्यवाही करून निंबाळकरवाडीमध्ये सर्व आदिवासींच्या घरात नवीन वीजजोडणी व रात्रीचा वीजपुरवठा अशी व्यवस्था करून दिली. ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी त्यांच्या तक्रारींसाठी ग्राहक पंचायतीशी ९४२१९१७३६४, ९४२२२६६१३३ या क्रमांकांवर संपर्क करावा.