News Flash

पाणीपुरवठय़ासाठी ९ कोटींचा निधी मंजूर -अजित पवार

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी राज्य सरकारने सोमवारी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

| February 12, 2013 02:26 am

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी राज्य सरकारने सोमवारी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर मराठवाडय़ातील अतितीव्र व तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या नगरपालिकांची क्रमवारी ठरविण्यात आली असून त्याचा आढावा नगरविकास विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी घ्यावा आणि कोणत्या नगरपालिकेस काय स्वरूपात मदत करावी, याचे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून जायकवाडीच्या जलाशयात १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे काहीअंशी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या निर्णयामुळे औरंगाबाद शहराला पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही, असे सांगितले जात होते. महापालिकेने मात्र मार्चनंतर पाणी उपसा करण्यासाठी ९ कोटी रुपयांची राज्य सरकारने मदत करावी, असा प्रस्ताव सादर केला होता. पंपगृहांसाठी हा निधी आवश्यक होता. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. मराठवाडय़ातील अन्य नगरपालिका क्षेत्रात कोठे तीव्र पाणीटंचाई जाणवेल, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सिल्लोड, जालना, उस्मानाबाद आणि उमरगा येथे तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातील उस्मानाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. अन्य नगरपालिकांचा आढावा प्रधान सचिव पोरवाल यांनी घ्यावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले. कन्नड, भोकरदन, उदगीर, मानवत येथेही तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई असल्याचे त्यांनी सांगितले. या शहरातील पाणीपुरवठय़ासाठी काय उपाययोजना करायच्या हे प्रस्ताव आल्यानंतर ठरवू, असे ते म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला गेले असल्याने माजलगाव धरणाला ज्या पद्धतीचे दरवाजे बसविण्यात आले आहे, तशी उपाययोजना करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निधी मंजूर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. विभागीय आयुक्तालयात घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांची उपस्थिती होती.  
पवारांचा दौरा, खासदारांची गैरहजेरी!
नेहमीच्या शिरस्त्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची पहिली बैठक खासदारांबरोबर होणार होती. सकाळी सुभेदारी विश्रामगृहावर खासदार चंद्रकांत खैरे व डॉ. पद्मसिंह पाटील हे दोघेच हजर होते. नंतर विभागीय आयुक्तालयात राज्यसभेच्या   खासदार रजनीताई पाटील याही बैठकीला आवर्जून आल्या. मराठवाडय़ातील अन्य खासदारांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली. शिवसेनेचे परभणीचे खासदार गणेश दुधगावकर परदेशात गेले आहेत. रविवारी जालना दौऱ्यात शरद पवार यांच्यासमवेत खासदार रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांची केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा झाली. त्यामुळे ते बैठकीला आले नसल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लेखी निवेदन पाठविल्याचे शरद पवार यांनीच सांगितले. खासदार सुभाष वानखेडे आलेच नाहीत. गोपीनाथ मुंडे व शरद पवार यांच्यातील ‘राजकीय सख्य’ सर्वश्रुत असल्याने ते या बैठकीत येणार नाहीत, असे गृहीत धरण्यात आले होते.  सकाळी लोकप्रतिनिधींच्या खुच्र्या रिकाम्याच दिसल्याने नंतर आमदारांना बोलावून घेतल्याची चर्चा रंगली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2013 2:26 am

Web Title: nine crores of fund has been passed for water supply ajit pawar
टॅग : Ncp
Next Stories
1 पोलीस अधिकारीच ‘संपर्क क्षेत्राबाहेर’!
2 ९ हजार गावांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचा वेल्फेअर ट्रस्ट स्थापन
3 नांदेड जि.प.मध्ये शिवसेना गटनेतेपदी इंगोले
Just Now!
X