News Flash

नाशिक जिल्ह्यात नऊ धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर

मेच्या अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे झाले असून नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील दोन धरणे कोरडी ठाक पडली असताना आणखी नऊ धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर

| May 22, 2014 12:31 pm

गंगापूर धरणात मुबलक पाण्यामुळे नाशिककरांना दिलासा
मेच्या अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे झाले असून नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील दोन धरणे कोरडी ठाक पडली असताना आणखी नऊ धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या धरणांमधून ज्या ज्या भागास पाणी पुरवठा होतो, तिथे गाळ मिश्रित गढूळ पाणी पिण्याची वेळ येणार आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा असल्याने नाशिककरांना टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. तथापि, मान्सूनचे नेहमीच्या वेळपत्रकानुसार आगमन न झाल्यास ग्रामीण भागातील टंचाईचे संकट भयावह स्वरुप धारण करू शकते.
उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील काही धरणांनी तळ गाठण्यास सुरूवात केल्यामुळे टंचाईचे संकट गंभीर वळणावर आले आहे. मान्सुनचे प्रमाण चांगले राहिल्याने गतवर्षी बहुतांश धरणांत समाधानकारक जलसाठा झाला होता. त्यामुळे मागील वर्षी उन्हाळ्यात भेडसावलेली तीव्र पाणी टंचाईची समस्या यंदा भेडसावणार नाही अशी चिन्हे होती. परंतु, जसजसा उन्हाळ्याचा हंगाम पुढे सरकत आहे, तसतसे या संकटाची धग प्रकर्षांने जाणवत आहे. टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड वेगाने होत आहे. सद्यस्थितीत नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील भोजापूर व तिसगाव ही दोन धरणे पूर्णपणे कोरडी झाली आहेत. गतवर्षी रिक्त झालेल्या धरणांची संख्या सहा होती. त्या तुलनेत यंदा स्थिती समाधानकारक म्हणावी लागेल. परंतु, पुढील काही दिवसात अल्प जलसाठय़ामुळे नऊ धरणे कोरडीठाक पडणार असल्याचे दिसते. त्यात कडवा पाच दशलक्ष घनफूट, पालखेड ५३, नांदुरमध्यमेश्वर १५, मुकणे १६, कश्यपी ३७, पुणेगाव १०, वालदेवी ३४, गौतमी ५८, वाघाड ९२ या धरणांचा समावेश आहे. या धरणांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी दिले जाते. अखेरच्या टप्प्यात तळाचे पाणी उचलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यामुळे पुढील काही दिवसात ही धरणे रिक्त धरणांच्या यादीत समाविष्ट होतील.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा असल्याने यंदा पाणी कपात करावी लागणार नसल्याचे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही धरणातील पाण्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत केले जाते. गंगापूर धरणात सध्या ३१३० दशलक्ष घनफूट जलसाठा असून गतवर्षी हे प्रमाण निम्म्याने कमी होते. गतवर्षी मेच्या मध्यावर कोरडय़ा झालेल्या दारणा धरणात यंदा १६९७ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. या शिवाय, ओझरखेड धरणात १५७, आळंदी १०१, भावलीमध्ये १०८ दशलक्ष घनफूट पाणी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. काही धरणात यंदा समाधानकारक स्थिती असली तरी भावली, वालदेवी, आळंदी, मुकणे या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा आहे. ज्या धरणांमध्ये अतिशय कमी जलसाठा आहे, तेथून उचलले जाणारे पाणी गाळमिश्रित राहण्याची शक्यता आहे.

मनमाडकरांना दिलासा
पाण्यासाठी कायमच तगमग करणाऱ्या मनमाडकरांना यंदा गतवर्षीइतक्या गंभीर व तीव्र स्वरुपाच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नसल्यासा दिलासा नगरपालिकेने दिला आहे. सध्याच्या पाणी पुरवठा व्यवस्थेनुसार मनमाड शहराला जुलैपर्यंत पाणी पुरणार आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी दिली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात ५ जुलैपर्यंत पुरेल इतका जलसाठा आहे. जुलैमध्ये पुन्हा पालखेडचे एक आवर्तन मिळणार असल्याने नागरिकांना ऑगस्टअखेर पाणी पुरवठा करणे शक्य होईल. ही परिस्थिती असली तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून तसेच उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन धात्रक यांनी केले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार व त्याच दिवशी पाणी पुरवठा करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. परंतु, काही तांत्रिक बिघाड झाल्यास अथवा वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाण्याची नियोजित वेळ व दिवसात बदल होत आहे. ज्या नळ जोडण्यांना तोटय़ा नाहीत, अशा नळजोडणी धारकांनी आपल्या नळाला तोटी बसवून घ्यावी, पाणी वाया जाऊ देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

२४२ गावात टँकरने पाणी पुरवठा
विभागात जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर सुरू नसला तरी नाशिक, धुळे व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावे व वाडय़ा टंचाईच्या गर्तेत सापडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात ९६ गावे व १७४ वाडय़ांना ८९ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. धुळे जिल्ह्यात चार गावांना चार टँकरने पाणी पुरविले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे संकट अधिक गहिरे आहे. तेथील १४२ गावे व ५४१ वाडय़ांना १८४ टँकरने पाणी पुरविले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:31 pm

Web Title: nine dams of nashik district do not have enough water storage
टॅग : Nashik District
Next Stories
1 पंचवटी परिसरात आज पाणी पुरवठा नाही
2 निकालाने आघाडी भानावर, एकतेच्या तालावर
3 आरोग्य व्यवस्थेच्या नियोजनात नदी आडवी
Just Now!
X