नववीला विद्यार्थ्यांना मोठय़ा संख्येने नापास करण्याने दहावीला निकाल तर फुगविण्याबरोबरच काही शाळांना त्यामुळे पैसा कमावण्याचा नवा मार्गही सापडला आहे. नववी नापास विद्यार्थ्यांना खासगीरीत्या दहावीच्या परीक्षेला बसविण्याच्या व खासगी शिकवणी देण्याच्या नावाखाली मुंबईतील अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळत आहेत.
नववीला नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागते. अन्यथा ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे खासगीरीत्या १७ क्रमांकाचा परीक्षा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांसमोर असतो. यापैकी खासगीरीत्या बसण्याचा पर्याय बहुतांश नापास विद्यार्थी अवलंबतात. या अर्जाकरिता मंडळ विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारते. परंतु, अनेक शाळा या अर्ज भरून घेण्यासाठी वाट्टेल ते शुल्क आकारून विद्यार्थ्यांना लुटत आहेत. कांदिवलीत क्लासचालकांशी ‘टायअप’ करण्यात कुख्यात असलेल्या एका संस्थेच्या शाळेतर्फे तर याकरिता दोन हजार रुपये इतके शुल्क आकारले जातात.
दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांना नववीला नापास करायचे आणि दुसरीकडे त्यांना खासगी शिकवणी देण्याच्या नावाखाली महिना अडीच हजार रुपये इतके शुल्क उकळायचे, असा कमाईचा नवाच मार्ग या शाळेने शोधला आहे. ‘शिवसेना’प्रणीत ‘युवा सेने’चे नेते व मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी या प्रकाराची तक्रार मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांकडेही केली आहे. केवळ ही एकच शाळा नव्हे तर मुंबईतील अनेक शाळा १७ क्रमांकाचा परीक्षा अर्ज भरून घेण्याच्या नावाखाली मुलांना व पालकांना लुबाडत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय दिला जावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचीही फसवणूक
मुंबईत दहावीच नव्हे, तर बारावीलाही खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहेत. त्यामुळे, शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी चरण्याचे नवे कुरणच मिळाले आहे. बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये शुल्क आकारावे असा राज्य शिक्षण मंडळाचा नियम असताना मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानीपणे अधिक पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लुबाडणूक करीत आहेत. काही महाविद्यालये दीड हजार तर काही चक्क १० ते १२ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारून विद्यार्थी आणि पालकांना लुबाडत आहेत. बारावीला गेल्या वर्षी २४,७१५ विद्यार्थ्यांनी १७ क्रमांकाचा अर्ज भरला होता, तर मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे ३९ हजारांच्या आसपास आहे. ‘प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे संबंधित महाविद्यालयाला २० रुपये मिळत असतात. तरीही महाविद्यालये दीड हजार ते १० हजार रुपयांपर्यंत विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली करीत आहेत,’ असा आरोप ‘शिक्षक, शिक्षकेतर स्थानीय लोकाधिकार समिती’चे सरचिटणीस प्रा. दिलीप देशमुख यांनी केला. समितीने या संदर्भात मंडळाकडेही तोंडी तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.