देशातील विज्ञान संशोधनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्राने स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेले ‘निर्भया’ उपकरण आता उपयोगासाठी सिद्ध झाले आहे. मोबाइलसोबत ‘ब्लू टूथ’ने जोडता येणाऱ्या या उपकरणाचे बटन दाबल्यावर जवळच्या व्यक्ती तसेच पोलिसांकडे संदेश पोहोचणार आहेत. जीपीएसवर आधारित असलेल्या या यंत्रामुळे अडचणीत अथवा संकटात सापडलेल्या संबंधित महिलेचे ठिकाणही समजणार असून तातडीने मदत करता येईल.
दिल्ली आणि मुंबई येथील सामूहिक बलात्कारांनंतर निर्जन व अनोळखी ठिकाणी जावे लागणाऱ्या एकटय़ा महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पर्याय शोधले गेले. मुंबई पोलिसांनीही मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे पोलीस तसेच नातलगांपर्यंत माहिती जाण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेले ‘टेली डिस्ट्रेस अलार्म डिव्हाइस’ येत आहे.
सुमारे १०० ग्रॅमचे हे उपकरण पर्स किंवा खिशामध्ये ठेवता येणार असून त्याच्या उपयोगासाठी मोबाइल आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत या उपकरणावरील बटन दाबल्यास ब्लू टूथच्या माध्यमातून त्या ठिकाणाचा सिग्नल मोबाइलकडे पाठवला जाईल. मोबाइलमध्ये आधीच साठवलेल्या पाच जवळच्या व्यक्तींकडे, आधी तयार करून ठेवलेला संदेश पोहोचेल. या व्यक्ती संबंधित स्त्रियांनीच निवडायच्या असून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, पोलीस आदींचे नंबर त्यात ठेवता येतील. यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकेल, असा उत्पादन तयार करणाऱ्या तज्ज्ञांचा दावा आहे.  भाभा अणुसंशोधन केंद्राने तयार केलेल्या या उपकरणाचे उत्पादन ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी अणुशक्तीनगर येथे अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. रतन कुमार सिन्हा यांच्या हस्ते या उपकरणाचे उद्घाटन होईल.
उपकरण सुरू कसे करावे
* उपकरणासोबत देण्यात येणाऱ्या सीडीवरून अ‍ॅन्ड्रॉइड व जावा सिस्टिम असलेल्या मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे.
* नाव, वय, लिंग, रक्तगट आदी माहिती तसेच आवश्यक ते पाच मोबाइल क्रमांक साठवावेत.
* ब्लू टूथच्या माध्यमातून उपकरण व मोबाइल  एकमेकांशी जोडावेत.
* आता हे उपकरण वापरण्यास तयार आहे.
* संकटकाळी बटन दाबल्यावर मिनिटामिनिटाला  बदलणारे ठिकाण संबंधित मोबाइलवर पाठवले जाईल.

आवश्यक बाबी
* मोबाइलमधील ब्लू टूथ सुरू असावे.
* या डिव्हाइसचे अ‍ॅप्लिकेशन मोबाइलवर ठेवणे गरजेचे आहे.
* उपकरणावरील दिवा लाल झाल्यास ते चार्ज करण्यास ठेवावे.
* हे उपकरण पाण्यापासून दूर ठेवावे.
* गरज नसताना एसओएस बटन दाबू नये.