शहरात सुरू असलेली विविध विकासकामे आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासोबतच ते मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी येत्या १४ जूनला विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. नागपूर हे देशात क्रमांक एकचे शहर बनविण्याचा निर्धार करणाऱ्या गडकरी यांनी मंत्रीपदाचा भार सांभाळताच काही सकारात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. शहरातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्यामुळे अधिकारी आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत.
नितीन गडकरी यांचे नागपुरात आगमन झाल्यावर शनिवारी सकाळपासून रविभवनमध्ये शहर व पसिरातील विविध समस्या आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दुपारी १ वाजता महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. जेएनएनयूआरएमतंर्गत महापालिकेचे १९ पैकी १३ प्रकल्प पूर्ण झाले असले तरी काही प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. काही प्रकल्प तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी गडकरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शहरातील सिमेंट रस्त्याचे बांधकाम, नाले सफाई, सुरेश भट सभागृह, पेंच ४ या प्रकल्पाच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
काही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे महापालिकेचे प्रकल्प रखडले असल्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या अंतर्गत शहरातील अनधिकृत लेआऊट व इतर विकास कामे, नियोजित मेट्रो, पाणी पुरवठा योजना आणि इतर विकास कामाचा आढावा गडकरी घेणार आहेत. मेट्रो प्रकल्पाला विविध विभागातर्फे लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गडकरी यांनी काम सुरू केले आहे. आतापर्यंत १६ विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रे मिळाल्याचे गडकरी यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे उर्वरित प्रमाणपत्रे मिळविण्यासंदर्भात ते प्रयत्न करणार आहेत. त्या दृष्टीने नासुप्रच्या अधिकाऱ्यांशी गडकरी चर्चा करणार आहे. महापालिका आयुक्त श्याम वर्धने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह विविध विभागातील अधिकारी या बैठकींना उपस्थित राहणार आहेत.
महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गासंबंधी कामाचा आढावा घेणार आहे. नागपूर आणि विदर्भासाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या मिहान प्रकल्पाच्या वस्तुस्थितीबाबत नितीन गडकरी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. मिहान प्रकल्पाच्या कामाचा गती कशी वाढवता येईल त्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक विभागाच्या फाईल्स प्रलंबित आहेत. त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलविण्यात आले आहे. शिवा दिल्लीवरून काही संबंधीत विभागाचे अधिकारी शनिवारी सकाळी नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.