मानवी भावभावना, त्यातील गुंतागुंत आणि त्याची उलगड होणे हाच खऱ्या अर्थाने सिनेमांचा विषय असावा असे मत व्यक्त केले जाते. बाह्य़ परिप्रेक्ष्य कोणतेही असले तरी पटकथेच्या गुंफणीतून अंतिमत: नात्यांचा भावनिक वेध घेताना अचूकपणे मांडणी करणारे चित्रपट प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतात. ‘पितृऋण’ हा चित्रपटही प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेण्यात चांगलाच यशस्वी ठरतो.
विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, भयपट, थरारपट असे ढोबळ मानाने काही चित्रपट प्रकार केले जातात. त्याच्या बाहेर जाऊन वेगळ्या प्रकारचा नातेसंबंधांवरचा भावनिक चित्रपट प्रकार या गटातला हा चित्रपट म्हणता येईल. अतिशय तरलपणे अस्फुट नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशक्त कथेवर बेतलेला असल्यामुळेही पटकथा आणि मांडणीवर त्याचा चांगला परिणाम झाला आहे. चांगली कथा मिळाल्यामुळे त्यातील व्यक्तिरेखांचे एकेक पदर अतिशय तरलपणे दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
व्यंकटेश कुलकर्णी हा पुरातत्व शास्त्राचा प्राध्यापक आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणी जाऊन पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने प्रत्यक्ष उत्खनन करणे, त्याचा अभ्यास करणे याची आवड व्यंकटेशला आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करू असे व्यंकटेश म्हणतो आणि पिंडाला कावळा शिवतो. त्यानंतर काहीच दिवसांत मध्यमवयीन व्यंकटेश आपली मुलगी देवयानीसोबत उत्खनन करण्याच्या ठिकाणी जात असताना त्याला आपल्यासारखाच दिसणारा माणूस दिसतो. आपल्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस जगात आहे आणि तो आपल्याला ओझरता दिसला याचे अप्रूप प्रत्येकालाच वाटेल. तसेच ते व्यंकटेशलाही वाटते. म्हणून त्या हुबेहूब दिसणाऱ्या माणसाला तो भेटतो आणि त्यातून त्याला उमगलेले सत्य यावर सबंध चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि पोस्टर पाहूनच पिंड-कावळा-इच्छा याच्याशी संबंधित चित्रपट आहे एवढे समजते. माणूस वरवर दिसतो त्यापेक्षा आतून तो खूप निराळा असतो. वडील, मुलगा, शिक्षक, कलावंत, उद्योगपती अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये हा एकच माणूस निरनिराळ्या पद्धतीने वावरत असतो आणि त्या त्या भूमिका, त्यापोटी येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये उत्तम पद्धतीने निभावण्यासाठी त्याची धडपड चाललेली असते. परंतु, या पलीकडे या विविध भूमिका एकाच आयुष्यात एकाच वेळी साकारताना त्याच्या आतला माणूस, त्याला भेटलेली माणसे, त्याला आलेले अनुभव यांचे गाठोडे उलगडले जातेच असे नाही. एखादी व्यक्ती आपल्या परिचयाची आहे, पण आपल्याला त्या व्यक्तीची ‘खरी ओळख’ माहीत असतेच असे नाही. मानवी मनाची गुंतागुंत, नात्यांचे पदर दिग्दर्शकाने तरलपणे मांडले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा प्रदीर्घ काळानंतर मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर आली आहे. भागीरथी या वृद्धेची भूूमिका, या व्यक्तिरेखेने सहन केलेले क्लेश आपल्या अभिनयातून चांगल्या पद्धतीने तनुजा यांनी व्यक्त केले आहेत. सचिन खेडेकरांनी दुहेरी भूमिकांमधील भेद दाखविण्यासाठी बोलण्याच्या वेगळ्या लकबी खुबीने वापरल्या आहेत. सुहास जोशी यांच्यासह सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असूनही संगीत-छायालेखन यांच्या उत्तम साथीने दिग्दर्शकाने परिपक्व पद्धतीने कथानकाची मांडणी केली आहे.
पितृऋण
इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स
निर्माते – अभय गाडगीळ, श्रीरंग गोडबोले
दिग्दर्शक – नितीश भारद्वाज
मूळ कथा – सुधा मूर्ती
पटकथा – नितीश भारद्वाज, प्रवीण तरडे
संवाद – प्रवीण तरडे
संगीत – कौशल इनामदार
छायालेखन – महेण अणे
कलावंत – सचिन खेडेकर, तनुजा, सुहास जोशी, मृणाल देशपांडे, ओम भूतकर, पूर्वी भावे, केतकी विलास, ओंकार कुलकर्णी, मधुरा जुगाडे, रूपेश बने.