News Flash

महापालिकेला ‘झेब्रा क्रॉसिंग’चा विसर

बेशिस्त वाहतूक व्यवस्था हा शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता असतानाही प्रशासनाकडून नेमकेपणाने त्याच मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

| May 1, 2015 01:23 am

बेशिस्त वाहतूक व्यवस्था हा शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता असतानाही प्रशासनाकडून नेमकेपणाने त्याच मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कित्येक वर्षांपासून शहरातील चौकांमध्ये ‘झेब्रा क्रॉसिंग’ची व्यवस्था नसताना किमान सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर ही व्यवस्था करण्यात येईल, अशी नाशिककरांना अपेक्षा असताना शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अद्याप बाकी असल्याने ती पूर्ण झाल्याशिवाय झेब्रा क्रॉसिंग व्यवस्थाही होणे शक्य नसल्याची माहिती देण्यात आल्याने बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे.
कुंभमेळ्याची तारीख जवळ येऊ लागली असली तरी त्यासंदर्भात सुरू असलेली विकासकामे संथपणे होत आहेत. सिंहस्थात पर्वणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी पेठ, दिंडोरी, गंगापूर, त्र्यंबक, शरणपूर, पाथर्डी, तपोवन, टाकळी आदी रस्त्यांची पाहणी करून अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करण्याची सूचना केली. चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग करावे, ज्या ठिकाणी पट्टे दिसेनासे झाले असतील त्या ठिकाणी नव्याने पट्टे आखावेत, जुने फलक काढून त्या ठिकाणी गरजेनुसार नवे दिशादर्शक फलक उभारावेत, रस्ता दुभाजक रंगवावेत, शहराच्या अंतर्गत व बाह्य़ ठिकाणी वाहनतळाची उभारणी आदी कामे सुचविण्यात आली आहेत. ही सर्व कामे महापालिकेने करावयाची असल्याने यासंदर्भातील सूचना, नोंदी अहवाल महापालिकेच्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला असून ही कामे पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत वायकुंडे यांनी दिली.
महापालिकेने झेब्रा क्रॉसिंग हा विषय अतिशय दुय्यम ठेवला आहे. जणूकाही शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकामी झेब्रा क्रॉसिंग हा मुद्दाच नाही की काय, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते. शहर परिसरातील जोड रस्ते, केंद्रीय रस्ते यासह नदीपात्राकडे येणारे, प्रशासकीय रस्ते आदी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे तर, काही ठिकाणी रस्ते डांबरीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. एप्रिलअखेपर्यंत ही कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा असताना अद्याप काही ठिकाणी कामांना सुरुवातही झालेली नाही. रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्याने पुढील सर्व कामे रखडली आहेत. कागदोपत्री ही कामे पूर्ण दिसत असली तरी २० मेपर्यंत रस्त्यांची सर्व कामे पूर्ण होऊन मेअखेपर्यंत झेब्रा क्रॉसिंगसह अन्य कामे पूर्ण होतील, असा अंदाज पालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून यशवंत व्यायामशाळेजवळील चौक, मेहेर चौक, त्र्यंबक चौक, मालेगाव स्टँडजवळील चौक यांसारख्या महत्त्वपूर्ण चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे काम न करणाऱ्या महापालिकेस आता रस्त्यांच्या कामाचे आयतेच निमित्त सापडले आहे. पालिकेने तीन प्रकारचे ७८० दिशादर्शक फलक तयार केले असून बाहेरून येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या सूचनेप्रमाणे त्या त्या जागेवर तसेच सर्व रेल्वे स्थानक, बस स्थानक, वाहनतळ, साधुग्राम, रामकुंड, सर्व घाट, महत्त्वाचे रस्ते व चौक या ठिकाणी त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचेही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 1:23 am

Web Title: nmc forgotten zebra crossing
टॅग : Nmc
Next Stories
1 लाचखोर वजनमापे निरीक्षकास सक्तमजुरी
2 वादळामुळे लागलेल्या आगीत ४० शेळ्यांचा मृत्यू
3 संपामुळे ‘राज्य परिवहन’ला सात लाखांचा फटका
Just Now!
X