नवी मुंबई पालिकेची बहुचर्चित प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत ७ फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात पार पडणार असून, ही रचना व आरक्षण मनासारखे पडावे यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी कुलदेवतेला साकडे घातले आहे.
या वेळी ५० टक्के महिलांचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. नवी मुंबईत यावेळी वाढत्या लोकसंख्येमुळे २२ प्रभाग अधिक होणार असून, ही संख्या ८९ ऐवजी १११ होणार आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत आरक्षणावर हरकती मागविल्या जाणार असून, आयोग त्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे.
यावेळची रचना ही संगणकीय पद्धतीने करण्यात आली आहे. पालिकेने सादर केलेल्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार आयोगाने रचना तयार केली आहे. याच वेळी प्रभागांवरील आरक्षणदेखील टाकले जाणार आहे. यात दहा अनुसूचित जाती, दोन अनूसुचित जमाती, तीस मागासवर्गीय आणि ६९ सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत. या संर्वगात ५० टक्के महिलांचे आरक्षण ठेवले जाणार असून १० फेब्रुवारीला हे आरक्षण जनतेच्या हरकती व सूचनांसाठी जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यावरील हरकतींवर सुनावणी होईल.