उरणमधील पूर्व विभागातील कोप्रोली परिसरासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची महिनाभरापूर्वी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला, मात्र बसेसमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. गडय़ा आपली टमटमच बरी असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.एनएमएमटीने उरणमधील प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मुंबई ते उरण अशी बससेवा सुरू केली. या सुविधेमुळे उरणमधील प्रवाशांची काही प्रमाणात का होईना सोय झाली आहे. उरणच्या पूर्व विभागातील विद्यार्थी, चाकरमान्यांना नवी मुंबई ते नवघर फाटादरम्यान जाण्यासाठी या सेवेचा लाभ होत असे. त्यापुढे नवघर ते कोप्रोली तसेच त्यापुढील प्रवास हा सहा आसनी टमटमने करावा लागत होता. येथील प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार कोप्रोलीपर्यंतची ही बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे उरण पूर्व विभागातील प्रवाशांच्या प्रवासी खर्चात शिवाय थेट सेवेमुळे वेळेचीही बचत झाल्याचे पिरकोन येथील प्रवासी विलास गावंड यांनी सांगितले. या बससेवेमुळे या मार्गावरील सहा आसनी तसेच तीन आसनी रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे. परंतु महिन्याभरापूर्वी नव्याने सुरू झालेल्या बसेस सध्या प्रवासादरम्यान बसमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने रस्त्यातच दुरुस्तीसाठी थांबत असल्याने प्रवाशांना बसमधून उतरून पर्यायी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे होणाऱ्या त्रासाने प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे काही प्रवासी हे पुन्हा ‘टमटम’ या रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे वळले असल्याचे दिसत आहे. या संदर्भात तुर्भे आगाराचे प्रमुख धर्मराज भगत यांच्याशी संपर्क साधला असता, या सीएनजी बसेस असल्याने पावसाळ्यात त्या बंद पडत असल्या, तरी या मार्गावरील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.