पनवेल शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा सुरू होईल की नाही याचा निकाल नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत लागणार आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २१ किंवा २४ ऑगस्टला नगरपरिषदेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये होणार आहे. या सभेमध्ये पनवेलमध्ये एनएमएमटीच्या बससेवेचा प्रश्न चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच या सभेमध्ये पनवेलकरांनी निवडून दिलेले नगरपरिषदेमधील सदस्य सामान्य प्रवाशांसाठी कोणती भूमिका बजावतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी नवी मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी पनवेल शहरामध्ये एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यासाठी त्यासंबंधित विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये एनएमएमटी प्रशासनाने नगरपरिषदेच्या ना हरकत दाखल्यानंतर आपण बससेवा सुरू करू, असा पवित्रा घेतल्यामुळे नगरपरिषदेच्या परवानगीनंतरच ही बससेवा सुरू होईल असा निर्णय बैठकीत झाला. नगरपरिषदेच्या बांधकाम व नियोजन विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. परंतु नगरपरिषदेची स्वत:ची बससेवा सुरू झाल्यावर ही बससेवा बंद करण्याच्या अटीवर या बससेवेला तूर्तास नगरपरिषद ना हरकत दाखला देईल, असेही नगरपरिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशासनाच्या टिप्पणीनंतर ही बससेवा सुरू करायची की नाही याचा निर्णय नगरपरिषदेमधील सदस्य घेणार आहेत. ही बससेवा सुरू झाल्यास सामान्य प्रवाशांना तीन आसनी रिक्षांशिवाय शहरात प्रवासाला पर्याय मिळणार आहे. निव्वळ सात ते १३ रुपयांमध्ये प्रवाशांना शहरातून रेल्वेस्थानक गाठता येणार आहे. नगरपरिषदेच्या परवानगीनंतर ही बससेवा शहरातील मुख्य तीन मार्गावर सुरू होईल. पनवेल रेल्वेस्थानक ते साईनगर (ठाणानाका मार्गे), पनवेल रेल्वेस्थानक ते (पोदीमार्गे तक्का) पळस्पे आणि पनवेल रेल्वेस्थानक ते (शिवाजी चौक मार्गे) उरणनाका या मार्गावर ही बससेवा सुरू होईल.