पनवेलकरांच्या हक्काच्या बससेवेच्या ना हरकत दाखल्याचा मुहूर्त टळला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी याअगोदर दिलेल्या माहितीप्रमाणे २१ ते २४ तारखेदरम्यान होणारी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होणार होती. परंतु नगर परिषदेच्या काही तांत्रिक अडचणींमुळे ही सभा आता शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे, असे चितळे यांनी सांगितले. आता पनवेलकरांच्या हक्काच्या बससेवेचा निकालाची प्रवाशांना शुक्रवापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पनवेल शहरामध्ये नगर परिषदेची स्वतंत्र परिवहन सेवा नाही, त्यामुळे सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) शहर ते रेल्वेस्थानक जोडणारी तीन वेगवेगळ्या मार्गावर बससेवा सुरू करावी, अशी मागणी सिटिझन युनिटी फोरम (कफ) या संस्थेने प्रवाशांच्या वतीने केली होती.मागील महिन्यात या मागणीसाठी पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी विविध प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पनवेल नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यासाठी नगर परिषदेचा ना हरकत दाखला द्यावा लागेल, त्यानंतर ही सेवा सुरू करू, असे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले होते. एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यासाठी नगर परिषदेने परवानगी द्यावी का, याचा सर्वस्वी निकाल नगर परिषदेमधील सदस्यांच्या बैठकीत २८ तारखेला ठरणार आहे. ही बससेवा सुरू झाल्यास सामान्य पनवेलकरांना ७ व १३ रुपयांमध्ये शहरातून पनवेल रेल्वेस्थानक गाठता येईल. सध्या ४० ते ५० रुपये देऊन शहर ते रेल्वेस्थानक असा तीन आसनी रिक्षातून पनवेलकर प्रवास करतात.