डबघाईला आलेल्या नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाचा डोलारा सांभाळण्यासाठी प्रशासनाने दहा कलमी कार्यक्रमाची आखणी केली असून त्यात एखाद्या खासगी कंपनीला त्यांच्या कामगार वाहतूक काळात भाडय़ाने बसेस् हव्या असतील तर त्या देण्याची तयारी उपक्रमाने केली आहे. त्याचबरोबर अडगळीत टाकलेल्या इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीन पुन्हा वापरात आणण्याचा विचार केला जाणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या ३६० बसेस् असलेल्या परिवहन उपक्रमाचा प्रवास अधोगतीच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. माजी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी त्यासाठी तुर्भे येथील बस आगाराला भेट देऊन उपक्रमाच्या कामकाजाची माहिती घेतली होती. त्यांच्या सूचनेवरून अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनी या उपक्रमाला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी दहा कलमी सुधारणा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात ईटीएम तिकिटांचा अंतर्भाव आहे. या तिकीट कार्यपद्धतीला कामगार संघटनेने चार वर्षांपूर्वी विरोध केला होता. त्यासाठी ह्य़ा माशीन फोडून टाकण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे तिकीट पद्धत अवलंबणारी नवी मुंबई पालिका पहिली होती, पण कामगारांच्या विरोधामुळे या मशीन माळ्यावर टाकण्याची वेळ उपक्रमावर आली होती. उपक्रम मासिक तीन कोटी तोटय़ावर चालत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर उपक्रम बंद करण्याची वेळ प्रशासनावर येईल. त्यामुळे उपक्रम सुधारण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी आठवडय़ातून एक दिवस परिवहनच्या बसेसमधून प्रवास करून अनुभव घेण्याची सूचना देण्यात आली आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुरू करण्यात आलेले मार्ग बंद करण्यात येणार असून तोटय़ातील मार्गावर संक्रात येणार आहे. जीसीसी पद्धतीने पुढील १८५ बसेस्चा कारभार चालणार असून ई-गव्हर्नन्स वाढविले जाणार आहे. यात नवी मुंबईत  औद्योगिक पट्टय़ात असलेल्या खासगी कारखान्यांतील कामगारांची ने-आण करण्यासाठी एनएमएमटीच्या बसेस भाडय़ाने देण्याच्या एका नावीन्यपूर्ण योजनेचा अंतर्भाव आहे. डॉ. पत्तीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. उपक्रम तशी चाचपणी करीत असून कारखान्यांच्या प्रतिसादावर ते अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.