‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कार्यकर्त्यांकडून उद्धट वर्तनाच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. अगदी पोलिसांवरही हात उगारण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. तरीही पोलिसांकडून त्याविरोधात काहीच कारवाई झालेली नाही.
नवसाला पावणारा म्हणून ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची ख्याती झाल्याने दरवर्षी लाखो भाविक लालबाग राजाच्या दर्शनासाठी येत असतात. मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. मात्र हेच कार्यकर्ते भाविकांशी उद्धट वर्तन करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. लालबागच्या कार्यकर्त्यांची अरेरावी एवढी आहे की त्यांनी पोलिसांवरही हात उगारला आहे. मात्र खुद्ध पोलिसांनीच मंडळाला पाठीशी घातल्याने अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. मागील वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोध तीन गुन्हे दाखल झाले होते. परंतु वर्ष उलटले तरी त्यावर कारवाई झालेली नाही.
महिला वकिलाचा विनयभंग
ठाण्यातील एक महिला वकील स्मिता देवकर यांचा लालबागत्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केला होता. त्या लालबागच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचा हात जोरात पिरगाळून शिवीगाळही केली होती. देवकर यांनी याबाबत काळाचौकी पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. परंतु आम्हाला ते कार्यकर्ते सापडत नाहीत, असे सांगून काळाचौकी पोलिसांनी हात वर केले आहेत. देवकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महिला पोलिसाला मारहाण
ताडदेव येथील शस्त्रास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या कविता पालेकर या महिला पोलीस शिपाई मागील वर्षी बंदोबस्तासाठी आल्या होत्या. कार्यकर्ते काही लोकांना रांगेशिवाय आत सोडत होते. त्याला पाळेकर यांनी आक्षेप घेतला. तेव्हा लालबागच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. गणवेषात असलेल्या महिला पोलीस शिपायाला मारहाण होऊनही अद्याप पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केलेली नाही
पोलिसाला मारहाण
पोलीस उपनिरीक्षक अशोक शरमाळे हे सुद्धा लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी होते. त्यांनाही कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्याबातही गुन्हा दाखल झाला होता. पण अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही.
असभ्य वर्तन करणारे मोकाट
‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या, त्यांचे डोके धरून आपटणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या चित्रफिती गेल्या वर्षी सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या. त्यातील दोन कार्यकर्ते स्पष्टपणे चित्रफितीत दिसत होते. त्यानंतर लगेच ते फरार झाले. त्यापैकी एक शिर्डीत लपून बसला होता. प्रकरण थंड झाल्यानंतर तो परतला. पण अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. हे दोन्ही कार्यकर्ते आजही राजरोस ‘लालबागचा राजा’च्या परिसरात फिरत आहेत.
 २०१२ मध्ये तर एका महिला पोलिसाच्या श्रीमुखात भडकाविण्यात आली होती. त्याचा आरोपीही डमी असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी जे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही याबाबत तपास करत आहोत आणि नेमकी काय कारवाई केली ते माहिती घेऊन सांगतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गीते यांनी दिली. यासंदर्भात ‘लालबागचा राजा’च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.