सामाजिक प्रतिष्ठेचे वलय लाभलेला क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर राज्यसभेत गेल्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या विकासाला हातभार लावील, अशी उपनगरवासीयांची अपेक्षा पुरती फोल ठरली आहे. राज्यसभा सदस्य या नात्याने मिळणाऱ्या दहा कोटींच्या विकास निधीपैकी एक पैसादेखील सचिन तेंडुलकरने विकासकामासाठी खर्च केला नसल्याने, दोन वर्षे हा निधी पडून राहिला आहे. राज्यसभेच्याच सदस्य असलेल्या अभिनेत्री रेखाच्या नावावर असलेला विकास निधीदेखील वापराविनाच पडून राहिल्याने, सामान्यांच्या विकासाचा या प्रतिष्ठितांना विसर पडला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर त्या खासदारास आपल्या पसंतीचा प्रदेश वा जिल्हा विकासासाठी निवडावा लागतो. तेथील विकास कामांसाठी त्या सदस्यास पाच कोटींचा वार्षिक निधीही मिळतो. या हिशेबाने सचिन तेंडुलकर व रेखा यांना गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी दहा कोटींचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध होता. भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी विकासासाठी आपले निवासी क्षेत्र असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्य़ाची निवड केली होती. मात्र या जिल्ह्य़ात तेंडुलकर यांच्या विकास निधीतून एक पैशाचेही विकासकाम उभे राहिले नाही. किंबहुना, अशा कोणत्याही कामाचा साधा प्रस्तावदेखील तेंडुलकर यांच्याकडून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यास सादरच झाला नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
अभिनेत्री रेखा यांच्या विकास निधीची तर आणखीनच वेगळी तऱ्हा आहे. त्यांनी तर विकासासाठी कोणत्याच जिल्ह्य़ाची वा प्रदेशाची निवड केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विकास निधीलाही धक्का लागलेला नाही. रस्ते विकास, शाळांच्या इमारतींची उभारणी, समाज मंदिरे, बस स्थानके किंवा मोफत पाणपोया अशा सामाजिक उपयोगाच्या विकासकामांकरिता या निधीचा वापर करण्याची खासदारास मुभा असते.
राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षांची असते. प्रत्येक वर्षी विकास निधीसाठी मिळणारी पाच कोटींची रक्कम त्या त्या वर्षी खर्च झाली नाही, तर ती पुढील वर्षांच्या रकमेत मिळविली जाते. सचिन व रेखा यांच्या निधीत दहा कोटी जमा झाले आहेत. आता पुढील वर्षी आणखी पाच कोटींची त्यात भर पडेल. सहा वर्षांत त्यांच्या खात्यात तीस कोटी जमा होतील. मुंबईच्या उपनगरांना अनेक सुविधांची प्रतीक्षा असल्याने सचिन तेंडुलकरच्या या विकास निधीतून आपल्या पदरी काय पडणार, याकडे उपनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.