राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर गडाख यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी केला. पण उमेदवार कोण हे मात्र त्यांना ठरवता आले नाही.
काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. वाकचौरे हे गडाखांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे गडाख विरोधकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमात बहुतेक वक्त्यांनी गडाख यांच्यावर टीका केली. आता विधानसभेत गडाख यांना घरी पाठविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. पण विरोधक उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढलेली होती.
मिळालेल्या व्यासपीठाचा उपयोग करून घेत आपण कसे योग्य आहोत. हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने आपल्या भाषणातून केला. कोणी भावनिक आवाहन केले, तर कोणी पक्षाच्या आड लपण्याचा प्रयत्न केला.
इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, मनसेचे इच्छुक उमेदवार दिलीप मोटे, भाजपचे अजित फाटके, भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा साहेबराव घाडगे या सर्व इच्छुक उमेदवारांची भाषणे झाली. सर्वानी आगामी निवडणुकीत गडाखांच्या विरोधात एकच उमेदवार देणे गरजेचे असल्याचे सांगितले.  
घाडगे म्हणाले, मला उमेदवारी दिल्यास मी ठोशास ठोसा देऊ शकतो. तालुक्यातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्वानी एकत्रित यावे. भाजपचे दिनकर गर्जे म्हणाले, की तालुक्याच्या हितासाठी पक्षविरहित सर्वानी एकत्र प्रस्थापितांच्या विरोधात ठोस कार्यक्र म राबवावा लागणार आहे. मनसेचे मोटे म्हणाले, की, ग्रामीण भागात चांगले काम करताना अनेक अडचणी आणल्या जात आहेत. त्या विरोधात आवाज उठवावा लागेल. दरम्यान शिवसेनेचे बाळासाहेब पवार यांनी पुढील विधानसभेसाठी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांनी उमेदवारी करावी असे प्रतिपादन केले. या वेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, पं. स. सदस्य जनार्दन जाधव, जगन्नाथ कोरडे, बाबा पतंगे, बाबा मोटे, अविनाश सोनवणे, अनिल ताके, अशोक वाकचौरे, लक्ष्मण मोहिटे, अशोक तांबे आदी उपस्थित होते.