आम्ही ‘कट प्रॅक्टीस’ करीत नव्हतो व यापुढेही करणार नाही. जे कुणी कट प्रॅक्टीस करतात, त्यांच्यावर कारवाई करावी. शहरातील दोन-चार डॉक्टर्स कट प्रॅक्टीस करीत असतील तर सर्वानाच दोषी ठरवणे योग्य नाही. आम्ही आतापर्यंत प्राणाणिकपणे व नैतिक भावनेने वैद्यकीय सेवा करीत होतो व यापुढेही करणार असल्याची ग्वाही शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी  पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टरांकडून ‘कट प्रॅक्टीस’ करण्याच्या प्रमाणात सर्वत्रच वाढ होत असून, तशा तक्रारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र वैद्यक परिषदेने दिला होता. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा डागाळत असल्याने डॉक्टरांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही परिषदेने दिला होता.
दरम्यान, परिषदेच्या या कारवाईच्या इशाऱ्यामुळे शहरातील कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर दुसरीकडे शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी एमसीआयच्या या निर्णयाचे स्वागत करून ‘कट प्रॅक्टीस’ करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केल्यास आमची कुठलीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनेचे अध्यक्ष व सचिवांची एक बैठक नुकतीच पार पडली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे व सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. एस.जे. आचार्य, सचिव डॉ. प्रमोद गांधी, असोसिएशन ऑफ फिजिशियनचे अध्यक्ष डॉ. आनंद काटे, सचिव डॉ. भालेराव, सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अभय सिन्हा, सचिव डॉ. विक्रम देसाई, विदर्भ रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन सारडा, सचिव डॉ. प्रवीण सागोळे, युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र मोहता व डॉ. सुहास साल्फेकर, असोसिएशन ऑफ इएनटी सर्जन्सचे अध्यक्ष डॉ. विवेक हरकरे व सचिव डॉ. नंदू कोलवाडकर, विदर्भ आर्थोपेडीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रवी भजनी व सचिव डॉ. प्रशांत राठी, विदर्भ असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजीस्टचे अध्यक्ष डॉ. कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य डॉक्टरही प्रामुख्याने उपस्थित होते.
एखादा डॉक्टर कट प्रॅक्टीस करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे सदस्यपद रद्द करू तसेच ही माहिती महाराष्ट्र वैद्यक परिषदेला कळवू. तसेच त्याला त्याच्या विशिष्ट संघटनेतूनही काढून टाकू. यानंतर एमएमसी त्याच्यावर न्यायोचित कारवाई करेल. अशी तक्रार रुग्णांसोबत एखादा डॉक्टरही करू शकतो. नागपुरात सर्वत्र सेवा शुल्क हे एकसारखे राहणार नसल्यावर डॉक्टरांचे एकमत होते.
प्रत्येक डॉक्टर कोणती यंत्रसामुग्री व कोणत्या पद्धतीच्या सेवा देतो, यावर त्याचे सेवा शुल्क अवलंबून असते. त्यामुळे एकाच आजारासाठी ठराविक सेवाशुल्क आकारणे हे कठीण काम आहे. असे असले तरी समाजाचा आमच्यावर जो विश्वास आहे, तो घालवायचा नाही. एखादा डॉक्टर एखाद्या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला इतर डॉक्टर पाठिंबा देतात, हा समाजाचा असलेला समज आम्हाला खोडून काढायचा आहे. अशा दोषी डॉक्टरांवर कारवाई होत असेल तर त्याला आमची संघटना कुठलाही पाठिंबा देणार नाही, असेही या बैठकीत ठरले.  या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती इंडियन मेडिकल असोसिएसनचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे आणि विदर्भ रेडिओलॉजी असोसिएसनचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन सारडा यांनी दिली.
समाजात दोन-चार डॉक्टर वाईट काम करतात, म्हणून सर्वच डॉक्टरांना दोषी ठरवणे योग्य नाही. नागपुरात सर्वप्रथम ‘बेटी बचाव’ ही घोषणा देऊन त्यासाठी आयएमएने काम केले. याची दखल देशातील अनेक संघटनांनी घेतली. सध्या देशात सर्वत्र बेटी बचाव ही मोहीम राबवली जात आहे.
संपूर्ण देशात म्हणूनच नागपूरकडे आदराने बघितले जाते. त्याचप्रमाणे एमएमसीने दिलेल्या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही आतापर्यत कट प्रॅक्टीस करत नव्हतो व पुढेही करणार नाही. परंतु जो कुणी कट प्रॅक्टीस करेल, त्याचे नाव आम्ही स्वतहून जाहीर करू, असेही डॉ. देशपांडे आणि डॉ. सारडा यांनी सांगितले.