फुलेनगर परिसरातील तुंबलेल्या गटारींची स्वच्छता केली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात थेट गटारीचे पाणी ओतले. यावेळी काहींनी कार्यालयातील टेबल व खुच्र्याची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. गटारीचे पाणी सर्वत्र पसरल्याने दरुगधीमुळे कार्यालयीन कामकाज संपूर्ण दिवस बंद राहिले. पालिका आयुक्तांनी रखडलेले काम त्वरित करण्याचे आश्वासन दिल्यावर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कार्यालयाच्या नुकसानीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतील फुलेनगर भागात गटार तुंबण्याची समस्या अनेक महिन्यांपासून भेडसावत आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. गटारी साफ होत नसल्याने त्यांचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने स्थानिकांमध्ये कमालीचा असंतोष होता. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पंचवटीच्या जुन्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांनी सोबत गटारीचे पाणी घेतले होते. भुयारी गटार विभागाचे अधिकारी आर. एस. पाटील यांच्याकडे आंदोलक दाद मागणार होते. तथापि, ते उपस्थित नव्हते. यामुळे आंदोलकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयात गटारीचे पाणी ओतले. टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. काही जणांना धक्काबुक्की झाल्याचे विभागीय अधिकारी एस. पी. वाघ यांनी सांगितले. अचानक घडलेल्या प्रकाराने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. गाळमिश्रित गटारीचे पाणी सर्वत्र टाकण्यात आल्याने कार्यालयात दरुगधी पसरली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेतली. डॉ. घोलप यांनी स्थानिकांच्या समस्यांची माहिती घेतली. वारंवार तक्रार करुनही अधिकारी दाद देत नाहीत. माणसे नाहीत. कर्मचारी सुटीवर आहेत. साहित्य नाही अशा सबबी सांगितल्या जातात. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश नसल्याची तक्रार डॉ. घोलप यांनी केली.
यावर आयुक्तांनी फुलेनगर परिसरातील सद्यस्थितीचे सर्वेक्षण करून उपरोक्त कामांसाठी संस्था नेमली जाईल असे आश्वासन आपणांस दिल्याचे घोलप यांनी सांगितले.
आंदोलकांनी कार्यालयात अनेक ठिकाणी गाळमिश्रीत गटारीचे पाणी ठिकठिकाणी टाकले. दमदाटी व शिवीगाळ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला होता. वरीष्ठ अधिकारी दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करावयाचा असल्याने साफसफाई करण्यात आली नाही. कार्यालयाचे विद्रुपीकरण, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली जाणार असल्याचे विभागीय अधिकारी वाघ यांनी नमूद केले. या घडामोडींमुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाज दिवसभर बंद राहिले.
दुपारी पोलीस यंत्रणेने घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून छोटी मोठी कामे होत नसल्याची ओरड सर्वपक्षीय नगरसेवक करत आहेत. सिंहस्थामुळे मूलभूत समस्या सोडविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निधी मिळत नसल्याच्या मुद्यावरून नगरसेवक आणि आयुक्तांमध्ये जुंपली आहे. त्यात आता फुलेनगर भागातील नागरिकांच्या या गोंधळाने भर टाकल्याचे दिसत आहे.