लोडशेडिंगचा चटकाही माहिती नसलेल्या, सदा झगमगणाऱ्या मुंबई महानगरीत राहूनही आरे कॉलनीतील तीन पाडे अजूनही अंधारात आहेत. अतिक्रमणांचे नाव देऊन अनेक वर्षे वीज- पाण्याच्या अधिकृत जोडण्यांपासून वंचित असलेल्या आरेमधील २७ पाडय़ांपैकी नऊ पाडय़ांमध्ये नुकत्याच विजेच्या तारा पोहोचल्या. काही पाडय़ांमध्ये त्याआधीच वीज आली होती. मात्र २० वर्षे प्रयत्न होऊनही वणीचा पाडा, जितुनीचा पाडा आणि नवशाचा पाडा या तीन वस्त्यांवरील शंभराहून अधिक आदिवासी घरे अजूनही प्रतीक्षेत आहेत.
शहराच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा प्रस्तावित सुपरफास्ट गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आरे कॉलनीमधून जाणार आहे. महानगरीतील पायाभूत सुविधांना आणखी मजबूत करणाऱ्या या रस्त्याच्या आजूबाजूला काहीशे मीटर परिसरात आदिवासींचे पाडे आहेत. मात्र काहीशे मीटरचे हे अंतर थेट आदिम काळात नेणारे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर शहरात वीज व पाणी या दोन गरजांचा क्रमांक लागतो. मागेल त्याला वीज देण्याचे बंधन वीजकंपन्यांवर घातले गेले असले तरीही अनेक परवानगी, अधिकृत कागदपत्रांचे अडथळे उभे करून अधिकृत वीज व पाणीजोडणीपासून आदिवासी पाडय़ातील घरांना दूर ठेवलेले आहे. गेल्या काही महिन्यात या ठिकाणच्या खांबाचा पाडा, मताई पाडा, गावदेवी, युनिट १९, युनिट ६, युनिट ३२ आणि युनिट २२ मध्ये वीज जोडणी देण्यात आली आहे. अर्थात पाडय़ापर्यंत वीज पोहोचली असली तरी प्रत्येक घरापर्यंत ती गेलेली नाही. १९९५ पूर्वीचे वास्तव्याचे दाखले सादर करू न शकलेल्या घरांमध्ये आजही अनधिकृत जोडणीने दिवा पेटतो.
२० वर्षे प्रयत्न करूनही अजूनही तीन पाडय़ात वीज आलेली नाही. प्रयत्न सुरू आहेत, एवढेच उत्तर दिले जाते. अतिक्रमण इतर लोक करतात. सुरक्षा अधिकारी त्याबाबत काही करत नाहीत. मात्र अतिक्रमणांचा आरोप ठेवून आम्हाला वीज दिली जात नाही, अशी खंत वणीचा पाडा येथील चंदू जाधव यांनी व्यक्त केली.

बिल जास्त मात्र तरीही अधिकृत जोडणीचा आग्रह
अनधिकृत जोडणीसाठी महिन्याला २०० रुपये भरावे लागतात. अधिकृत मीटर आलेल्यांच्या विजेचे भाडे वापरानुसार ३०० पासून सात-आठशेपर्यंत गेले आहे. मात्र तरीही अधिकृत वीजजोडणीचा आदिवासींचा आग्रह कायम आहे. अनधिकृत जोडणी असली की कायम भीती असते. कधीकधी पटकन वीज जाते. पावसात या विजेचा भरवसा नसतो. त्यापेक्षाही स्वतची हक्काची जोडणी असली तर जादा पैसे भरायला हरकत नाही, अशी भावना खांबाचा पाडा येथील लक्ष्मी पागे यांनी व्यक्त केली. भू-माफिया आणि पाणी माफिया
जंगलात सतत अतिक्रमण होत असल्याचे वनाधिकारी सांगतात व त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. आरेमधील झोपडय़ांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढते आहे. बिगर आदिवासींच्या वस्त्या तर वाढत आहेतच, पण आदिवासींच्या वस्त्यांच्या शेजारीही घरे उभी राहत आहेत. आम्ही वनजमिनी अतिक्रमण करतो, असे सांगून एकीकडे आम्हाला मूलभूत सोयींपासून वंचित ठेवले जाते तर दुसरीकडे आमच्या वस्त्यांशेजारी उभ्या राहणाऱ्या घरांमध्ये वीज, पाणी सुविधा येतात. आरे कॉलनीतील गुरांची स्थिती माणसांपेक्षा चांगली आहे. त्यांना वेळच्या वेळी अन्न मिळते, प्यायला पाणी मिळते, त्यांच्या गोठय़ात वीज आहे. मात्र वर्षांनुवर्षे इथे राहणारी माणसे मात्र या तिन्हीबाबत वंचित आहेत, असे येथील स्थानिक नेते चंदू जाधव म्हणाले. घरे बांधून देणारे भूमाफिया आणि पाणीमाफिया यांचे वर्चस्व इथे वाढत आहेत. १९९५ मध्ये वणीच्या पाडय़ात केवळ २६ घरे होती. आता तिथे १३३ घरे झाली आहेत. मुख्यत्वे
गेल्या दोन वर्षांत घरांची संख्या वाढली आहे. आणि आताही त्यातील २६ घरेच आदिवासींची आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शौचालयांमुळे रस्तेही झाले..
खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून आरे कॉलनीतील मताई पाडा, वणीचा पाडा, जितुनीचा पाडा, फुकटय़ा तळीचा पाडा, देवीपाडा, खांबाचा पाडा या ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या जागेचा वाद असल्याने नवशाचा पाडा येथे शौचालय बांधण्यास परवानगी मिळालेली नाही. मात्र उर्वरित शौचालये तयार आहेत. या शौचालयांकडे जाण्यासाठी रस्ता गरजेचा असल्याने आता या वाडय़ांमधील कोब्याच्या खड्डेमय रस्त्याचे रूपडेही पालटले आहे. पाडय़ातील पायवाटांवर पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरू आहे. हे पेव्हर ब्लॉक किती काळ टिकतील याबाबत शंका असली तरी सचिन तेंडुलकर येण्याची शक्यता असल्याने पावसातही वेगाने काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला सौरऊर्जेवरील दिवेही उभे करण्यात आले आहेत.

बिबळे आणि बस..
खांबाचा पाडय़ामागचा डोंगर उतरून गेले की मुलांची शाळा येते. मात्र या डोंगरावरूनच अनेक बिबळे वस्तीत अनेकदा येतात. गेल्या वर्षी शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर बिबळ्याने संध्याकाळी हल्ला केल्याच्या तीन चार घटना घडल्या. तेव्हा बेस्टने या परिसरातील मुलांसाठी बसची सेवा उपलब्ध करून दिली. मात्र बसची वेळ अनियमित असते. त्यातच शनिवारच्या अध्र्या दिवसाचे वेळापत्रक बेस्टच्या गावी नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना पोहोचवले तरी येताना मुले एकटीच डोंगरावरून येतात. काही वेळा बसचा लांबचा फेरा मुलांना आवडत नाही. पाडा उतरून रस्त्यावर पोहोचायला दहा मिनिटे आणि मग लांबच्या रस्त्याने अख्ख्या आरेला वळसा घालत शाळेत जाण्यापेक्षा मागचा डोंगर चढणे-उतरणे त्यांना सोपे वाटते.

वीजजोडणीचे काम सुरू
वणीचा पाडा येथे वीजजोडणीचे काम सुरू आहे, मात्र त्यासाठी तीन ते चार महिने लागतील. जितुनीचा पाडा येथे वीजजोडणी गेली आहे. मात्र या पाडय़ातील एकाही घराकडून वीजजोडणीसाठी अर्ज आलेला नाही आणि नवशाचा पाडा येथेही वीजपुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती रिलायन्स एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांनी सांगितले.