मान्सून पूर्व पावसाच्या सरींमुळे उरण तालुक्याच्या पूर्व विभागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. पूर्व विभागातील अनेक गावांना मागील तीन ते चार दिवसापासूनच वीज नसल्याने संपूर्ण कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावरच मोर्चा काढला.
 भारनियमन नसतानाही उरण परिसरातील वीज अनेकदा गायब होते. रविवारी उरणमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील वीज सहा तास बंद होती, तर उरणपासून १५ किलोमीटरवर असलेल्या खोपटासह पूर्व विभागातील वीज तीन दिवसांपासून गायब आहे. रविवारच्या पावसामुळे येथील विजेचा ट्रान्सफार्मर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर पडल्याने पाण्यापासूनही येथील नागरिकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे, अशी माहिती खोपटे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय ठाकूर यांनी दिली. केगाव परिसरातही हीच स्थिती असल्याने याचा जाब विचारण्यासाठी येथील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
या संदर्भात महावितरण कार्यालयात संपर्क साधला असता कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते तर उरण महावितरणचे सहायक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला त्यांचा तो होऊ शकला नाही.