ठाणे- वाशी- पनवेल महामार्गावर सिडकोच्या वतीने सुंदर अशी रेल्वे स्थानके उभारण्यात आली, मात्र वाशी, जुईनगर, रबाळे, सानपाडा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांत सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे अपंगांसाठी जिने नसल्याने अपंगांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नियमावलीत अपंगांसाठी जिने उभारण्याचे नमूद करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ठाणे- वाशी- बेलापूर मार्गावर सिडकोने काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकांची निर्मिती करून अद्ययावत सुविधा आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अनेक सुविधा दिल्या आहेत. मात्र दरदिवशी ४० हजारांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या रबाले, वाशी, सानपाडा, जुईनगर या रेल्वे स्थानकांत मात्र अपंगांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. सुमारे तीन ते चार हजार अपंग वाशी, रबाले, जुईनगर, सानपाडा या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात. अपंगांसाठी हार्बर मार्गावर ऐरोली, कोपरखरणे, सीबीडी अशा काही रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र जिने आहेत. त्यामुळे अपंगांना रेल्वे पकडण्यासाठी तसेच इच्छित स्थळी जाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. मात्र वाशी, सानपाडा, जुईनगर, रबाले या ठिकणी जिने नसल्याने अपंगांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या जिन्यांवरूनच इतर नागरिकांचे सहकार्य घेऊन अपंगांना रेल्वे पकडण्यासाठी फलाटावर जावे लागते. सकाळ-संध्याकाळी  त्यांचे खूप हाल होतात. अनेकदा तोल जाऊन अपघातही झाले आहेत. अपंगांनी स्वतंत्र जिन्यांची वेळोवेळी मागणी केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सरकता जिना हवा
हार्बर मार्गावर जिने नसल्याने अपंग विकलांगांची हेळसांड होत आहे. काही रेल्वे स्थानकांमध्ये जिने नसल्याने आम्हाला इतरांचा आधार घेऊन ये-जा करावी लागते. वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी किमान अपंगांसाठी सरकता जिना सुरू करून दिल्यास आम्हाला दिलासा मिळेल.  
रामराव होंडे, अपंग कर्मचारी
दिशादर्शकांचा अभाव  
नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील फलाटांवर अपंगांसाठी दिशादर्शक नसल्याने गाडी पकडण्यासाठी त्रास होतो   
अपंग प्रवासी