मुळा, भंडारदरा व दारणा धरणांमधून जायकवाडी जलाशयात पाण्याचा प्रवाह निर्विघ्नपणे शुक्रवारी सुरू झाला. सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दारणा धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पुढील तीन-चार दिवस पाण्याचा ओघ कायम राहील. त्यानंतर पाणीपातळीतील वाढ कळू शकणार आहे. दरम्यान, जायकवाडीत आलेल्या पाण्याचे पिण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, साडेचार टीएमसी पाणी जलाशयात आल्यास दि. ३१ जुलैपर्यंत पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
औरंगाबाद महापालिकेला दररोज १५० दशलक्ष लीटर पाणी लागते. पुढील आठ महिन्यांसाठी साधारण १.४३ टीएमसी पाणी उपयुक्त साठय़ातील पाणी शहराला पिण्यासाठी लागणार आहे. उद्योगासाठी यापुढे ०.४७ टीएमसी पाण्याची गरज असेल. दररोज उद्योगाला ५० लाख लीटर पाणी देण्यात येते. औद्यागिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी ३३ टक्के पाणी कपात केली. ती कायम ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. शहराचा पाणीपुरवठा व औद्योगिक वसाहतीस होणारा पाणीपुरवठा, तसेच जालना-अंबड-गेवराई येथील पाणीपुरवठय़ासाठी दरमहा पाच दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. म्हणजे वार्षिक १.४१ टीएमसी पाणी राखून ठेवावे लागणार आहे. परभणी जिल्हय़ातील मानवत व झरी येथील पाणीपुरवठा योजनांना जायकवाडीतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी ०.३५ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात येते. नाथषष्ठीनिमित्त हजारो भाविक पैठण नगरीत येतात. त्यासाठीही पाणी सोडावे लागते. नव्याने जलाशयात दाखल होणाऱ्या पाण्याचा असा हिशेब सरकारी पातळीवर तयार झाला आहे.
नाशिक व नगर जिल्हय़ांतून नऊ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर जायकवाडी जलाशयात साडेचार-पाच टीएमसी पाणी पोहोचेल, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या जायकवाडीत १.५४ टीएमसी जलसाठा शिल्लक आहे. नवीन पाण्याची पातळी कदाचित ६.५४ टीएमसी असू शकेल, असे अधिकारी सांगतात.
जायकवाडीचे पात्र बशीच्या आकाराचे असल्याने येथून पुढच्या २४० दिवसांत ४.९४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. मात्र, आता आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद शहरासह ३०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणे शक्य आहे. तथापि, पाणीउपसा केल्यानंतर गळती होणार नाही याची काळजी महापालिका व पाणीपुरवठा योजनांची देखभाल करणाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, शुक्रवारी दारणा धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली. आता निर्णयाप्रमाणे प्रत्येक धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. कोल्हापूर पद्धतीचे काही बंधारे भरून घ्या, असे नगरच्या नेत्यांनी कळविले असले तरी पाणी पोहोचावे, यासाठी सर्व त्या उपाययोजना आखल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.     

दृष्टिक्षेपात चित्र
*     औरंगाबाद शहर पाणीपुरवठय़ासाठी लागणार १.४३ टीएमसी पाणी, ३१ जुलैपर्यंतचा पाणीप्रश्न निकाली.
*      उद्योगासाठी दररोज ५० एमएलडी पाणी, पण दररोज ३३ टक्के पाणीकपात कायम.
*      औरंगाबाद शहर, तसेच जायकवाडीवर अवलंबून असणाऱ्या ३०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली.
*     एकूण उपलब्ध पाण्यातील ४.०९ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन शक्य.