रेल्वे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत आणि मृतांची संख्या कमी व्हावी यासाठी ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात, त्या रेल्वे स्थानकांमध्ये तीन महिन्यांमध्ये आपत्कालिन वैद्यकीय केंद्र उभारण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही अद्याप निश्चित केलेल्या स्थानकांवर अशी केंद्रे उभारण्याबाबत रेल्वेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. स्थानकांबाहेर रुग्णवाहिका उभी करण्याचा प्रस्तावही बासनात गुंडाळण्यात आला आहे.
चालत्या गाडीतून पडून, खांब लागून किंवा रेल्वे मार्ग ओलांडताना गाडीचा धक्का लागून गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या रुग्णास तात्काळ उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. अनेकदा अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढवला आहे. रेल्वे स्थानकामध्येच आपत्कालीन वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्याचे आदेश गेल्या महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, वडाळा, वाशी, पनवेल, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, वसई रोड आणि पालघर येथे स्थानकांमध्ये केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र या स्थानकांवर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही रेल्वेकडून कोणतीही हालचाल महिन्याभरात सुरू झालेली नाही.
आपत्कालीन उपचार केंद्र उभारण्याबाबत न्यायालयाच्या आदेशापूर्वी काही उपनगरी रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र रेल्वे स्थानकांबाहेर अनधिकृत बांधकामांनी संपूर्ण जागा व्यापल्यामुळे तसेच पालिका आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे रुग्णवाहिका उभी करण्यासाठी जागेची अडचण यामुळे हा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला आहे. परिणामी ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्याची समस्या कायम राहिली आहे.