गेल्या फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पालघर येथे समारंभपूर्वक राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच अन्न सुरक्षा कायद्याचा अध्यादेशही काढला. तरीही प्रशासकीय पातळीवरील उदासिनता कायम असून यंदा शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी जिल्ह्य़ातील अनेक भागांत माध्यान्ह्य़ आहार धान्यपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपासमार सुरू आहे.
जिल्ह्य़ातील मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांमध्ये अद्याप माध्यान्ह्य़ आहार धान्यपुरवठा होऊ शकलेला नाही. इतर तालुक्यांमध्येही थोडय़ाफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. काही शाळांचे शिक्षक गेल्या वर्षीचे धान्य साफसूफ करून ते मुलांना शिजवून देत आहेत. काही शाळांमध्ये शिल्लक असणाऱ्या धान्यात प्रामुख्याने फक्त तांदूळ आहे. त्यामुळे मुलांना दुपारी फक्त भात शिजवून दिला जातो. ‘त्याबरोबर खाण्यासाठी आमटी अथवा भाजी घरून घेऊन या’, असे त्यांना सांगितले जाते. धान्य नसलेल्या शाळांमध्ये मुले उपाशीपोटीच बसतात. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतमजुरांचे हलाखीचे दिवस असतात. त्यात पोषण आहाराचा अभाव असेल तर कुपोषण कसे कमी होणार असा सवाल, मुरबाड येथील श्रमिक मुक्ती दलाच्या इंदवी तुळपुळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.