छोटा राजन टोळीतील हस्तक रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याची ‘चकमक’ मुंबई पोलिसांना चांगलीच महागात पडल्यानंतर आता समस्त पोलीस अधिकाऱ्यांनी ‘चकमक’फेम बिरुदावलीचा चांगलाच धसका घेतला आहे. चकमकी नको, अशी भूमिका घेऊन चकमकींच्या वादग्रस्ततेवर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई पोलीसदलात एकेकाळी ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांची फौज होती. ती आता खालसा झाली असून आता फक्त प्रफुल्ल भोसले आणि दया नायक हेच फक्त सेवेत राहिले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांनाही आता तो भूतकाळ नकोसा वाटतो आहे.
मुंबईत १२-१५ वर्षांपूर्वी संघटित गुन्हेगारीने अक्षरश: कहर केला होता. दिवसाआड गोळीबार ठरलेलाच. दोन टोळ्यांतील संघर्षही रस्त्यावर उतरला होता. काही वेळा निरपराध माणसेही गुंडांच्या गोळीबारांना बळी पडत होती. तेव्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त रणजित शर्मा, डी. शिवानंदन आदींनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोहीम उघडली. या मोहिमेला प्रदीप सावंत गुन्हे अन्वेषण विभागात आल्यानंतर अधिकच जोर आला. प्रदीप शर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, रवींद्रनाथ आंग्रे, अरूण बोरुडे, दया नायक आदी अधिकाऱ्यांची नावे चकमकफेम म्हणून पुढे आली. यापैकी अनेकांच्या खात्यावर ५० ते १०० गुंडांना यमसदनी धाडल्याची नोंद आहे. प्रदीप सावंत गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त असताना तब्बल ३०० हून अधिक गुंडांना चकमकीत ठार करण्यात आले. या कारवाईने  संघटित गुन्हेगारीचा कणाच पूर्णपणे मोडला गेला. या चकमकफेम अधिकाऱ्यांपैकी प्रदीप शर्मा यांना तर ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले. दाऊद, छोटा शकील, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक टोळीने या चकमकफेम अधिकाऱ्यांचा धसकाच घेतला.
गवळीच्या दगडी चाळीत शिरण्याची पोलिसांची हिंमत होत नव्हती तेथे विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले हे अधिकारी थेट घुसले. छोटा शकीलच्या खंडणीच्या दूरध्वनींनी हैराण झालेल्या बिल्डर, व्यावसायिकांना प्रदीप शर्मा, रवींद्रनाथ आंग्रे या अधिकाऱ्यांनी दिलासा दिला. अमर नाईक, छोटा राजनच्या गुंडांनाही सळो की पळो करून सोडले. याचा परिणाम म्हणजे संघटित गुन्हेगारीचा रक्तपात कमी झाला. या चकमकफेम अधिकाऱ्यांचा उदोउदो होऊ लागला. मात्र संघटित गुन्हेगारी टोळीचा खात्मा केल्यानंतर छोटे गुंडही पोलिसांच्या चकमकींना बळी पडू लागले. या काळात शर्मा यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. ख्वाजा युनुस प्रकरणात प्रफुल्ल भोसले अडकले. सुरेश मंचेकरसारख्या कट्टर गुंडाला चकमकीत ठार करणारे आंग्रेही अनेक आरोपांमध्ये गुंतले. अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणात अरुण बोरुडेंनी आत्महत्या केली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दया नायक चार-पाच वर्षे सेवेपासून दूर राहिले. एकेक करून सर्व ‘चकमक’फेम अधिकारी वादग्रस्त ठरले. यापैकी प्रफुल्ल भोसले, दया नायक वगळता आता कुणीही पोलीस सेवेत परत आलेले नाहीत. ज्या चकमकींनी प्रसिद्धी दिली, त्या चकमकीच आता या पोलिसांना नकोशा झाल्या आहेत. चकमकींमुळे ज्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी जवळ केले, तेच आयपीएस अधिकारी आता आपल्या केबीनचे दारही या अधिकाऱ्यांना उघडत नसल्यामुळे संबंधित अधिकारीही अस्वस्थ झाले आहेत.

चकमकी कशा थंडावल्या?
छोटा राजन टोळीतील लखनभय्या याची चकमक शेवटची. मात्र या चकमकीनंतर मुंबईत एकही चकमक झालेली नाही. अचानक या चकमकी बंद का झाल्या, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. आता अनेक टोळ्यांचे गुंड पकडले जात आहेत. गेल्या तीन वर्षांत मुंबईत एकही चकमक झालेली नाही. याबाबत एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, चकमकींबद्दल वाद होतेच. सहआयुक्त हिमांशू रॉय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चकमक ही ठरवून केली जात नाही. ती त्या त्या वेळची परिस्थिती असते. सगळ्याच चकमकी खोटय़ा होत्या, असे विधान करणे बरोबर नाही.