हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने घरगुती गॅस सिलेंडर घरपोच करण्याची सेवा नावडे नोडमध्ये बंद करत पनवेल तालुक्यामध्ये नवीन विकसित झालेल्या नोडमध्ये अजब प्रथा सुरू केली आहे. या प्रथेचा फटका सुमारे शंभराहून अधिक गॅसधारकांना बसला आहे.
नावडे नोडमधील मुख्य चौकात श्री पावशा इमारतीसमोरील मार्गालगत एचपी गॅस सिलेंडरने भरलेला रिक्षा टेम्पो उभा असतो. या नोडमधील एचपी कंपनीच्या गॅस वितरकांनी आपले रिकामी सिलेंडर्स तेथे आणायचे आणि तेथून नवीन भरलेला सिलेंडर उचलून घरी घेऊन जावा, असा नवीन नियम एचपी कंपनीच्या वरदविनायक कंपनीच्या गॅस वितरकांनी तयार करून ग्राहकांच्या माथी मारला आहे. या नवीन नियमाचा फटका नावडे नोडमधील वरदविनायक गॅसधारकांना होत आहे. सकाळच्या वेळी हा टेम्पो नोडमध्ये उभा राहतो, त्यामुळे त्या वेळी घरात गृहिणींखेरीज घरात अन्य कोणीही नसतात म्हणून सिलेंडर आणण्याची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येऊन ठेपते. शेजारील महिलेच्या मदतीने रिकामा सिलेंडर उचलून श्री पावशा इमारतीजवळील टेम्पोपर्यंत आणायचा व तेथून भरलेला सिलेंडर पुन्हा घरी उचलून नेण्याचे श्रम नावडे वसाहतीमधील गृहिणींच्या नशिबी आधुनिक युगात आले आहेत. सर्व सिडको वसाहतींमध्ये गॅस सिलेंडर घरपोच करण्याची सेवा दिली जाते; परंतु नावडे येथे सिलेंडरचा भाव इतर वसाहतींएवढाच आकारूनही सिलेंडर पुरवठा घरापर्यंत होत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. सिलेंडरच्या एकूण रकमेत सेवाकर वरदविनायक एजन्सीच्या वितरकांनी घेऊ नये, अशी मागणी सिलेंडरधारकांकडून होत आहे. नावडे नोडसाठी वेगळा नियम लागू केल्याने येथील गृहिणींना सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीला सिलेंडर पुरवठय़ाच्या सेवा कराची रक्कम भरूनही सिलेंडर उचलून घरी घेऊन संसाराची चूल पेटवण्याची वेळ आली आहे.
नावडे नोडमध्ये शंभराहून कमी गॅस उपभोक्ता आहेत. येथील ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळत नसल्याने अचानक सिलेंडर संपल्यावर कळंबोली येथील वरदविनायक गॅस वितरकांकडून सिलेंडर आणण्यासाठी दीडशे रुपये रिक्षाभाडे खर्च करून हा सिलेंडर मिळत असल्याने नावडे नोडमध्ये एक सिलेंडर घरी आणण्यासाठी ९०० रुपये खर्च होतो. एचपी पेट्रोलियम कंपनी व वरदविनायक वितरक एजन्सीच्या या अजब प्रथेबाबत येथे राहणाऱ्या सुषमा देवळे या महिलेने संताप व्यक्त करत घरपोच सिलेंडर मिळावे, अशी मागणी केली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. वरदविनायक गॅस वितरण करणाऱ्या कंपनीने अशी कोणतीही प्रथा नसण्याची शक्यता फेटाळली आहे. त्यामुळे नावडे नोडमध्ये रस्त्याकडेला सिलेंडर भरून उभा असलेला तो रिक्षाटेम्पो कोणाचा, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना याबाबत ग्राहकांनी विचारल्यावर नावडे नोडमध्ये कमी गॅसधारक असल्यामुळे घरपोच सेवा करणे तोटय़ाचे असल्यामुळे तेथे घरपोच सिलेंडर सेवा पुरवू नये, असे आदेश वरिष्ठांचे असल्याचे सांगतात.  

अशी कोणतीही प्रथा आमच्या एजन्सीने पाडलेली नाही. आम्ही घरपोच सिलेंडर सेवा वसाहतीमध्ये देतो. तरीही नावडे नोडमधील आमच्या गॅसधारकांना याबाबतचा त्रास होत असल्यास संबंधित ग्राहकाने थेट आमच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातही जेथे कमी गॅस वितरकांचा पुरवठा असतो तेथे आम्हीच घरपोच सेवा दिलेली आहे. .
    -एकनाथ गडकरी,
    वरदविनायक गॅस एजन्सीचे मालक  

घरपोच गॅस सिलेंडर हा नियम शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आला आहे. वितरकाला ग्रामीण भागात वाहतूक खर्चामुळे अतिरिक्त खर्च येत असल्यास तो घरपोच सिलेंडरनंतर वाढीव खर्चाचा तपशील लावून तो ग्राहकाकडून आकारू शकतो. मात्र वितरकाने सिलेंडर घरपोच करणे गरजेचे आहे. इतर सिडको नोडमध्ये ज्या प्रकारे गॅस सिलेंडर घरी पोहोचवले जातात त्या प्रकारे संबंधित एजन्सीने घरपोच सिलेंडर पोहोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे. गॅसधारकांनी त्याबाबतची तक्रार आमच्याकडे केल्यास संबंधित एजन्सीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.     -शशिकांत वाघमारे, नायब तहसीलदार (पुरवठा) पनवेल</p>