25 September 2020

News Flash

हॉर्न वाजवताय? तुमच्यावर लक्ष आहे!

वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे, मुळातील अरुंद रस्ते अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोडी होते.

| February 14, 2014 06:45 am

वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे, मुळातील अरुंद रस्ते अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोडी होते. पुढची गाडी पुढे सरकत नसल्याने संतापून वाजत राहणारे कर्कश्श हॉर्न हे मुंबई किंवा कोणत्याही मोठय़ा शहरातील सामान्य दृश्य. या वाहतूक कोंडीत असलेल्या आणि तिच्या आसपास राहणाऱ्यांना ध्वनिप्रदूषण म्हणजे काय हे चांगले कळते. हॉर्नच्या प्रदूषणात घुसमटलेल्या शहरांची मुक्तता व्हावी यासाठी एक अनोखे मीटर विकसित करण्यात आला आहे. हा मीटर वाहनांवर बसविण्यास सरकारने हिरवा कंदिल दाखविल्यास हॉर्न वाजविण्यावर आपसूकच मर्यादा येईल आणि हळूहळू वाहनांवर ‘नो हॉर्न प्लिज’चे संदेश दिसू लागतील, असा हे मीटर विकसित करणाऱ्यांचा विश्वास आहे. आशिया खंडात वाहनचालक हॉर्नचा बेसुमार वापर करतात. वास्तविक अनेक प्रगत देशांमध्ये हॉर्न वाजवणे असभ्यपणाचे मानले जाते.  तर काही देशांमध्ये वारंवार हॉर्न वाजविणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. या पाश्र्वभूमीवर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरणस्नेही जयराज साळगावकर यांनी भारतीय चालकांची सतत हॉर्न वाजविण्याची सवय मोडून काढण्याचा संकल्प सोडला आहे. साळगावकर यांच्या संकल्पनेतून काही आयटी तज्ज्ञांनी वाहनचालक किती वेळा हॉर्न वाजवितो यावर करडी नजर ठेवणारे मीटर विकसित केले आहे. वाहनचालक किती वेळा हॉर्न वाजवितो याची नोंद या ‘ओरेन’ नामक मीटरवर होणार आहे. त्यामुळे वारंवार हॉर्न वाजविणाऱ्या चालकाला दंड ठोठावणे वाहतूक पोलिसांना शक्य होणार आहे. हॉर्नची तीव्रता मोजण्याची व्यवस्था या मीटरमध्ये नसली तरी किती काळ आणि वेळा तो वाजविण्यात आला याची नोंद त्यावर होऊ शकणार होणार आहे. मोबाईलप्रमाणेच हे मीटरही रिचार्ज करावे लागेल. रिचार्जची सुविधा सर्व पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती साळगावकर यांनी दिली. रिचार्जची आवश्यकता भासताच मीटरवरील लाल दिवा लुकलुकू लागतो. मात्र तरीही वाहनचालकाने रिचार्ज केले नाही आणि मीटरवरील लाल दिवा वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आला, तर चालकाला दंड होऊ शकतो. या मीटरचे सादरीकरण अमित डावजेकर यांनी केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ‘ओरेन’चे सादरीकरण करण्यात आले असून त्यांनाही कल्पना आवडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 6:45 am

Web Title: no horn please
टॅग Mumbai News
Next Stories
1 पालिका पदपथांवरील दिव्यांचे आयआयटीमार्फत सर्वेक्षण करणार
2 ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल: उत्तर आलं
3 ..आणि बाईंचा अभिनय प्रशिक्षण वर्ग सुरू झाला!
Just Now!
X