परभणी शहरातील वीजबिल वसुली असलेल्या भागात भारनियमन करू नये, तसेच गेल्या तीनचार दिवसांपासून रात्री एक तासाने वाढविलेले भारनियमन बंद करावे, अशी मागणी आमदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी व डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेऊन केली. विजेचा वापर व वसुलीचे सर्वेक्षण करून निश्चित काही भाग भारनियमन मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
शहरातील वसमत रस्त्यावरील शिवाजीनगर, शिवरामनगर, एकता कॉलनी आदी भाग भारनियमनमुक्त केला आहे. या ठिकाणी वसुलीचे प्रमाण १०० टक्के असल्याचे सांगण्यात येते. परंतु इतरही काही भागात वसुलीचे प्रमाण १०० टक्के आहे. परंतु हा भाग भारनियमनमुक्त नाही.
विद्युत फिडरवर असलेल्या ग्राहकांच्या वीजवापर व वसुलीवर सध्या भारनियमन चालू आहे. बिल भरूनही वीज मिळत नाही. हे अन्यायकारक   असल्याच्या    भावना  आमदार जाधव यांनी गणेशकर यांच्यासमोर मांडल्या.
मुख्य बाजारपेठेत थकीत बिलासह चालू बिल भरण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. तरीही हा भाग भारनियमनमुक्त केला नाही. मुख्य बाजारपेठही भारनियमनमुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली. परभणी शहरातील वीज वापर व वसुली याबाबत पुनर्सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी वीजबिल वसुली व्यवस्थित आहे.
त्या भागात भारनियमन बंद करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन गणेशकर यांनी दिले. शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, शिवसेनेचे अतुल सरोदे, गजानन देशमुख, माणिक पोंढे, अनिल डहाळे, रामप्रसाद रणेर, डॉ. भक्कड आदींचा समावेश होता.