‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या घोषात माळेगाव यात्रेची सुरुवात झाली आणि सर्वाना आठवण झाली ती काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ‘माधुरी’ घोडीची! गोपीनाथरावांचा ‘राजा’ आणि विलासरावांची ‘माधुरी’ हे या यात्रेचे आकर्षण असायचे. या वर्षी या दोन्ही नेत्यांची उमदी जनावरे यात्रेत दिसली नाहीत आणि परिसरातील यात्रेकरूंमध्ये एकच भावना होती, ती राजाश्रय हरपल्याची. या दोन्ही नेत्यांचे घोडे आले नसले, तरी आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र ‘बादल’ आणि ‘तुफान’ माळेगावच्या यात्रेत आवर्जून पाठविले.
माळेगावची यात्रा सुरू झाली की, राजकीय शाब्दिक फटकेबाजीला उधाण यायचे. विलासराव त्यांच्या खुमासदार शैलीत समारोपाचे भाषण करायचे नि म्हणायचे ‘ताटात पडले काय नि वाटीत पडले काय?’ मुख्यमंत्रिपद लातूरकडून नांदेडकडे अशी या विधानाला पाश्र्वभूमी असे. माळेगावचा खंडोबा देशमुख कुटुंबीयांचे कुलदैवत. दरवर्षी विलासराव देशमुख माळेगावच्या यात्रेला सपत्नीक येत. त्यांच्या माधुरी नावाच्या घोडीचेही खास आकर्षण असायचे. कारण दुसरीकडे त्यांचे मित्र खासदार गोपीनाथ मुंडे यांचा ‘राजा’ नावाचा घोडाही यात्रेत येत असे. पंडितअण्णा मुंडे या घोडय़ाला घेऊन येत. त्यांच्या कुटुंबातही वाद झाला. ‘राजा’ यात्रेत आला नाही. राजकारणात या घोडय़ांचीही शाब्दिक कोटी करायला हे दोन्ही नेते विसरत नसत. विलासराव देशमुख सत्तेमध्ये आणि गोपीनाथराव विरोधात. त्याचे वर्णन खासेच केले जाई, ‘माधुरी’ सावलीत आणि ‘राजा’ उन्हात!
या वर्षी शासकीय विश्रामगृहाजवळ प्रत्येक यात्रेकरू येत. ‘माधुरी’ आली का हे पाहत आणि न दिसल्यास निराश होत परत जात. यात्रेला आल्यानंतर देशमुख कुटुंबीयांचे स्वागत प्रताप पाटील चिखलीकर मोठय़ा थाटामाटात करत. काँग्रेसच्या ताब्यात जिल्हा परिषद असतानाही देशमुखांच्या स्वागताला मात्र प्रताप पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा असे. आतषबाजीही तेच करत. मंदिरातील विश्वस्तांनाही गाऱ्हाणी ऐकून घेणारा हक्काचा नेता विलासरावांच्या रूपाने दिसायचा. या वर्षी ‘पालकत्व’च हरविल्याचे वातावरण आहे. त्यामुळे या वर्षीच्या यात्रेत न आलेल्या घोडय़ांची चर्चा आहे.