३० सप्टेंबर हा पावसाचा माघारीचा दिवस. मात्र यावर्षी या चार महिन्यांच्या पाहुण्याचा मुक्काम बराच लांबला आहे. ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेल्यावरही तो हलण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या ५० वर्षांत सर्वात जास्त काळ लांबलेल्या या पावसाने शेतीवर तर परिणाम केलाच; पण शहरी भागातही या लांबलेल्या पावसाचे विविध परिणाम दिसू लागले आहेत.
नोव्हेंबर हिट?
साधारण ३० सप्टेंबरच्या सुमारास पाऊस माघारी परततो. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये वायव्येकडून उत्तर भारतात येणारया थंड वाऱ्यांचा प्रभाव पडून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा आस्वाद घेता येतो. मात्र ऑक्टोबर महिना मात्र त्यावेळच्या तापमानासाठी नापसंत ठरतो. पाऊस गेल्याने आणि थंडी पडण्यापूर्वीच्या या काळात तापमान वाढत जाते. या महिन्यातील काही दिवसात तर तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त होते. यावेळी मात्र पावसाळा लांबल्याने ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा सुखात गेला आहे. आणखी किमान आठवडाभर तरी पावसाची शक्यता आहे. मात्र असे असले तरी ऑक्टोबर हिटमधून सुटका झाल्याचा निश्वास सोडता येणार नाही. ‘वायव्येकडून येणारे वारे निश्चित केव्हा येतील व त्यांचा प्रभाव दक्षिणेतील राज्यांपर्यंत केव्हा पोहोचेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे यावर्षी कदाचित नोव्हेंबर हिटचा अनुभव घ्यावा लागेल,’ अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
आरोग्यविभाग ‘ऑन-डय़ुटी’
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना आळा घालण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर असते. डासांमुळे तसेच पाण्यामुळे फैलावणाऱ्या आजारांच्या साथी काबूत ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करावे लागते. कीटकनाशक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर पावसाळ्याच्या चार महिन्यात अधिक काम पडते. सप्टेंबर संपल्यावर हुश्श म्हणणाऱ्या या कर्मचाऱ्यांना यावर्षी मात्र ओव्हरटाइम करावा लागला आहे. सप्टेंबरमध्ये उन आणि पाऊस यांचा खेळ सुरू असल्याने विषाणूंचे प्रमाण वाढण्याचा जास्त धोका होता. विषाणूंमुळे होणारा डेंग्यू तसेच तापाची साथ यांना आळा घालण्यासाठी अजूनही आरोग्यशिबिरे सुरू आहेत. या शिबिरांमुळे पडणाऱ्या कामाविषयी पालिकेचा कोणताही कर्मचारी उघडपणे बोलत नसला तरी पावसाळा केव्हा जातोय आणि साथीच्या आजारांची कामे केव्हा सुटताहेत, त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
तलावातील पाणीसाठा मात्र तेवढाच..
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पडणाऱ्या पावसावर संपूर्ण वर्षांचे पाण्याचे नियोजन अवलंबून असते. दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी तलावातील पाणीसाठ्यानुसार दिवसाला पुरवठा करता येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठरवला जातो. यावेळी सप्टेंबर अखेरीला सर्व तलावात मिळून १३ लाख ७० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने तलावातील पाणीसाठय़ात फारशी वाढ होऊ शकली नव्हती. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा एकदा हात दिला व पाणीसाठय़ात वाढ झाली. पाऊस नेहमीपेक्षा लांबला असला तरी ऑक्टोबर महिन्यात तुरळक सरी पडत असल्याने त्याचा पाणीसाठय़ाच्या दृष्टीने फारसा उपयोग झाला नाही, अशी माहिती मुख्य जलअभियंता आर. बी. बांबळे यांनी दिली.
झाडांबाबत संदिग्धता
पावसाचा सर्वात जास्त काळ मारा सहन कराव्या लागणाऱ्या झाडांनाही पावसाच्या अतिरेकाला तोंड द्यावे लागणार आहे. पावसासोबतच ऑक्टोबर हिट व त्यानंतरच्या थंडीचा मोहरावर परिणाम होत असतो. ‘यातील कोणताही एक घटक कमी अधिक प्रमाणात झाला तरी त्याचा परिणाम होतोच. लांबलेल्या पावसासोबत ऑक्टोबर हिट व डिसेंबरमधील थंडी यांचा विचार करूनच झाडांच्या मोहराबाबत निश्चित माहिती मिळू शकेल,’ असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी यांनी सांगितले.