बहुचर्चित मेट्रो प्रकल्प सुरू होण्यात सत्राशेसाठ विघ्ने येत असली, तरी विघ्नांचा हा सिलसिला मेट्रो सुरू झाल्यानंतरही कायमच राहणार आहे. अर्थात त्याचा थेट त्रास मेट्रो प्रवाशांना होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी आणि घाटकोपर या दोन स्थानकांवरील ताण वाढणार आहे. पश्चिम रेल्वेने त्याचा विचार करून अंधेरी स्थानकाची अक्षरश: पुनर्बाधणी केली. मात्र मध्य रेल्वेने घाटकोपर स्थानकात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे घाटकोपर येथे मेट्रो प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.
मेट्रोमुळे वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून घाटकोपर स्थानकात बदल होणे अपेक्षित होते. ते काम मध्य रेल्वे किंवा एमएमआरडीए या दोघांनीही केलेले नाही, असा आरोप पी. एन. श्रीधरन या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. श्रीधरन यांनी रेल्वे, एमएमआरडीए आणि रिलायन्स या तिघांशीही पत्रव्यवहार करून त्यांना घाटकोपर येथील समस्यांचा पाढा वाचून दाखवला आहे. मात्र आता मेट्रो सुरू होण्यास काहीच दिवसांचा अवधी शिल्लक असूनही यापैकी एकाही समस्येची तड लावणे या तीनही संस्थांना जमलेले नाही.
रेल्वे व मेट्रो स्थानकांची जोडणी
घाटकोपर पश्चिमेला असलेले मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक एकमेकांशी जोडलेले असणे अपेक्षित होते. मध्य रेल्वे व एमएमआरडीए यांनी घाटकोपर स्थानकातील मोठा पादचारी पूल आणि मेट्रो स्थानक एकमेकांशी जोडले आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकात येण्यास कोणताच रस्ता नाही. घाटकोपर पश्चिमेला मोठा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलालाही जोडण्यात आला आहे. हाच स्कायवॉक मेट्रो स्थानकाला जोडला जाणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही. हा स्कायवॉक आणि मेट्रो यांना जोडणारा १० फुटांचा पॅच अद्याप एमएमआरडीए अथवा रिलायन्सने बांधलेला नाही.
बस थांबा आणि मेट्रो जिना
मेट्रो स्थानकातून बाहेर पडणारा एक जिना ठाण्याच्या दिशेला उतरतो. हा जिना उतरल्या उतरल्या बेस्टचा थांबा आहे. सकाळच्या वेळी या थांब्यावर प्रचंड गर्दी असते. तसेच या भागात वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने रिक्षावालेही येथेच गर्दी करून उभे असतात. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक फेरीवाल्यांचा तळही येथेच असतो. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सूचना फलक कुठे आहेत?
येत्या पंधरवडय़ात मेट्रो सुरू होणार, अशा वल्गना करणाऱ्या एमएमआरडीए, रिलायन्स यांनी रेल्वेशी बोलणी करून घाटकोपर रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक येथे प्रवाशांसाठी उपयुक्त असे सूचना फलक लावणे आवश्यक होते. या सूचना फलकांवर मेट्रो अथवा रेल्वे स्थानकाची दिशा, तिकीट खिडक्यांचे स्थान यांच्याबरोबरच रेल्वे आणि मेट्रो यांचे इंडिकेटर्सही असणे अपेक्षित होते. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशाला पुढील मेट्रोची वेळ रेल्वे पुलावरच कळली, तर सोयीचे होईल. त्याचप्रमाणे मेट्रोच्या प्रवाशांना उपनगरीय गाडय़ांच्या वेळेची माहिती मिळाल्यास उपयुक्त ठरेल. मात्र तशा प्रकारची कोणतीही सोय झालेली नाही.
पूर्व-पश्चिम जोडणीचे काय?
मेट्रोतून प्रवास करणारा प्रवासी घाटकोपर पूर्वेला राहणाराही असू शकतो. मात्र मेट्रो स्थानकातून बाहेर पडताना रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा वापर केल्याशिवाय घाटकोपर पूर्वेला जाणे शक्य नाही. त्यासाठी एसपीएन दोशी महाविद्यालयाजवळील वाहनांच्या पुलावरून जाणे आवश्यक आहे. हा लांबचा वळसा असून एवढे अंतर चालणेही शक्य नाही. मात्र मेट्रोच्या अधिकृत तिकिटाचा आधार घेऊन प्रवासी रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर करू शकतात का, याबाबत अद्याप काहीच बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे आणि मेट्रो या दोन्ही प्राधिकरणांमध्ये सामंजस्याने बोलणी न झाल्यास मेट्रोचे प्रवासी रेल्वेच्या पुलावर आढळले, तर त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा प्रकारही घडू शकतो.