मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एमयूटीपी-२ या प्रकल्पानुसार मुंबईकरांच्या वाटय़ाला ९५ नवीन गाडय़ा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र या नव्या गाडय़ांसाठी किमान सहा महिने तरी मुहूर्त नसल्याचे स्पष्ट होत आहे. या नव्या गाडय़ांच्या धाटणीची एक गाडी चेन्नईच्या कार्यशाळेत तयार होत आहे. ती गाडी नोव्हेंबरमध्ये मुंबईत चाचणीसाठी येणार आहे. ही चाचणी दोन ते तीन महिने चालणार असून त्यानंतर नव्या गाडय़ा बनवण्याची ‘ऑर्डर’ देण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.मुंबईच्या गरजा लक्षात घेत मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची (एमयूटीपी) घोषणा केली. हा प्रोजेक्ट तीन टप्प्यांमध्ये आकाराला येणार असून त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामे चालू असून त्यात डीसी-एसी परिवर्तन, मध्य रेल्वेवर पाचवा-सहावा मार्ग अशी अनेक महत्त्वाकांक्षी कामे आहेत. या टप्प्यातच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या ताफ्यात ९५ नव्या गाडय़ा सामील होणार आहेत. मात्र या गाडय़ा कधी येतील, याबाबत एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, निश्चित कालावधी सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या मध्य रेल्वेवर एकूण ७५ गाडय़ा आहेत. या गाडय़ांच्या मदतीने १२०० फेऱ्या दर दिवशी चालवल्या जातात. यात खोपोली, कसारा, पनवेलपर्यंतच्या सर्व फेऱ्यांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवर ८३ गाडय़ा असून त्या गाडय़ांच्या मदतीने दर दिवशी १३०५ सेवा चालवल्या जातात. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते मध्य रेल्वेवर आणखी दहा गाडय़ा मिळाल्यास सेवांची संख्या वाढवणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी एमयूटीपीच्या या दुसऱ्या टप्प्यातील ९५ नव्या गाडय़ांकडे सर्वाचे लक्ष आहे.
मात्र, या ९५ गाडय़ा चेन्नईच्या कार्यशाळेत बनणार आहेत. या गाडय़ांच्या धाटणीची एक गाडी अद्याप तयार होत असून ती नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन महिने या गाडीची कसून तपासणी केली जाईल. त्यात काही सुधारणा आवश्यक असल्या, तर त्यासंबंधी सूचना केल्या जातील. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वेसाठी आवश्यक अशा ९५ गाडय़ा तयार करण्याचे कंत्राट दिले जाईल, असे एमआरव्हीसीच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे किमान सहा ते आठ महिने मुंबईकरांच्या वाटय़ाला नव्या गाडय़ा येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.