शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षा मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केली. येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. सिंग यांनी नेतृत्व कसे असावे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजसेवा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. मनुष्य जन्म काही सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे नेमून दिलेले काम कोणतीही अपेक्षा, अभिलाषा न ठेवता केल्यास त्याचा निश्चितच उपयोग स्वत:ला पर्यायाने कुटुंबाला आणि देशालाही होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर उपस्थित होते. यावेळी रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून गुरूमित सिंग रावल यांनी ज्ञानेश्वर शेवाळे तर, सचिव म्हणून प्रशांत हातेकर यांनी  किरण सागोरे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमात शेवाळे व सागोरे यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन जयेश संघवी यांनी केले.