अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेमध्ये मुळात दुसरा गट नाही आणि असेल तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय कामे केली ते जाहीर करावे, असे आव्हान देऊन अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी विरोधी गटाच्या कार्यकाळाबाबत शंका व्यक्त केली.
यशवंत बाजीराव यांच्या ‘दी ग्रेट त्रिमूर्ती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने मोहन जोशी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेची निवडणूक बोगस मतपत्रिकेवरून गाजली ती कोणामुळे? याचा शोध घेणे गरजेचे आहे. मुळात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची निवडणूक प्रक्रिया बदलविण्यासंदर्भात चार वर्षांपूर्वी समिती स्थापन केली होती. मात्र त्यावेळी लक्ष दिले नाही. मुळात ज्यांना नाटय़ संस्था आणि चळवळीशी काही देणे घेणे नाही अशी मंडळी परिषदेमध्ये सहभागी झाली होती. केवळ परिषदेजवळ ‘बँक बॅलेन्स’ किती आहे किंवा परिषदेकडून आपल्याला काय फायदा होतो, याचाच त्यांनी विचार केला. नाटय़ चळवळ वाढविण्यासाठी किंवा परिषदेची आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न केले? असा प्रश्न  त्यांनी उपस्थित केला. परिषदेची निवडणूक पद्धत चुकीची आहे, ती बदलविण्यात यावी, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष नाशिकचे असल्यामुळे सर्व व्यवहार  तेथूनच करण्यात आले. निवडणूक प्रक्रियासुद्धा नाशिकमधून राबविण्यात आली. त्यामुळे मतपत्रिकांचा गोंधळ झाला. मतपत्रिका पाठविण्याचे कामसुद्धा नाशिकमधून करण्यात आले, त्यामुळे अनेक बोगस मतपत्रिका मोठय़ा प्रमाणात आढळून आल्या आहेत. मराठी नाटकांबाबत बोलताना मोहन जोशी म्हणाले, सगळी व्यावसायिक नाटके विदर्भात सादर करणे शक्य नाही. विदर्भात एखादे नाटक सादर करतो म्हटले तर निर्मात्याला परवडत नाही. मुळात नागपुरात चांगली थिएटर्स नाहीत आणि जी आहेत त्याचे भाडे परवडण्यासारखे नाही. सलग पाच सहा प्रयोग असले की नाटय़ संस्थांना त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे परिषदेने मधल्या काळात काही शहरामध्ये संस्थांची निवड करून त्यांनी स्वस्त नाटक योजना राबविली. त्या योजनेच्या माध्यमतून चांगली नाटके शहरात आणून ती रसिकांना दाखविण्यात आली. इंदूरमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. असा प्रयोग सर्व शहरांमध्ये राबविण्यात यावा.
झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांना मदत करण्यासाठी नाटय़ परिषदकडून प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्यावर्षी झाडीपट्टीतील काही कलावंताचा अपघात झाला होता. शिवाय एका महिला कलावंताचा अपघात झाला आहे, अशा कलावंतांबाबत चौकशी करून  त्यांच्यासाठी काय करता येईल त्या दृष्टीने परिषदेकडून प्रयत्न केले जाईल. झाडीपट्टी रंगभूमीविषयी आस्था               आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून काम करीत आहे, त्यामुळे तेथील कलावंतांच्या समस्या काय आहेत, याची माहिती आहे. आगामी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनामध्ये झाडीपट्टी रंगभूमीला स्थान देण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
नाटय़ संमेलन स्थळासाठी प्रस्ताव
अखिल मराठी नाटय़ परिषदेतर्फे होणाऱ्या आगामी नाटय़ संमेलनासाठी नागपूरसह सातारा, ठाणे, नवी मुंबई येथून प्रस्ताव आले आहेत. नुकतीच निवडणूक आटोपल्याने त्या विषयावर चर्चा करण्यात आली नाही, मात्र परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची लवकरच बैठक आयोजित करून नाटय़ संमेलनाच्या स्थळांबाबत चर्चा केली जाईल, असेही जोशी यांनी सांगितले.