ठाणे शहरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांना नाइलाजास्तव शहरातील अरुंद रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. अरुंद रस्त्यांमुळे रेल्वे स्थानकांच्या दिशेने जाताना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गुरुवारी शिवसेनेच्या मोर्चामुळे ठाणेकरांच्या त्रासात आणखी भर पडली. या मोर्चामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करायची नाहीत, असा आदेशच पोलिसांनी काढला. त्यामुळे दररोज सवयीनुसार रस्त्याच्या कडेला आपल्या वाहनांसाठी ‘जागा’ शोधणाऱ्या ठाणेकरांची पंचाईत झाली. विशेष म्हणजे, टेंभी नाक्यावर या मोर्चामुळे वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा चक्का जाम झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते.
ठाणे शहरातील झोपडपट्टी, धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा एकत्रित पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी मंत्रालयावर मोर्चा काढला. मात्र या मोच्र्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे ठाणे पोलिसांनीही परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही गुरुवारी सकाळी टेंभीनाका येथील भवानी चौकात शिवसैनिकांचे जथ्थे जमू लागले होते. त्यानंतर शिवसैनिक मोर्चा घेऊन आनंदनगर चेक नाक्याच्या दिशेने निघाले. या मोच्र्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलिसांनी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. जांभळी नाका ते ठाणे स्थानक परिसरात वाहनांच्या अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठाण्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या गोखले मार्गावरही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच गडकरी चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास, नौपाडा, एमटीएनएल, कोपरी आदी परिसरांतही वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यांवरही जाणवू लागला होता. मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर चेकनाका परिसरातही वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, शहरात वाहने उभी करण्यासाठी अधिकृत वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ठाणेकर शहरातील अरुंद रस्त्यांवरच बेकायदा वाहने उभी करतात. पण या मोच्र्याचा फटका त्यांनाही बसला. या मोच्र्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, या उद्देशातून वाहतूक पोलिसांनी मोर्चा मार्गावर बेकायदा उभी करण्यात आलेली वाहने हटविली. अचानकपणे सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांची भंबेरी उडाली आणि वाहने उभी कुठे करायची, असा प्रश्न त्यांना पडला.