समुद्राच्या लाटांवर हेलकावणाऱ्या क्रूझवर रंगणाऱ्या नववर्षांच्या स्वागताच्या पाटर्य़ाची मजौ काही औरच. पण, यंदा पाटर्य़ापासून अनेकांना मुकावे लागणार आहे. कारण, खासगी क्रूझवर पाटर्य़ाच्या आयोजनाला यावर्षीही परवानगी देण्याचा पोलिसांचा विचार नाही. समुद्रकिनाऱ्यांजवळ लाटांवर हेलकावे खाणाऱ्या क्रुझवरील पाटर्य़ा एकेकाळी मुंबईच्या नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनचे वैशिष्टय़ होत्या. मद्य आणि संगीताच्या तालावर ३१ डिसेंबरला रात्री सुरू होणाऱ्या या पाटर्य़ा पहाटेपर्यंत रंगायच्या. पण, २००८ मध्ये मुंबईवर समुद्र किनाऱ्यामार्गे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबईच्या आसपास अरबी समुद्रात होणाऱ्या क्रुझ पाटर्य़ाना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली. ही बंदी आजतागायत कायम आहे. खासगी बोटींनी रात्री साडेआठच्या आत किनाऱ्यांवर परत येणे बंधनकारक करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणारे पोलिस किंवा मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी रात्री साडेआठनंतर कोणत्याही बोटीला समुद्रात फिरू देत नाहीत. हा नियम यावर्षीही शिथील करण्यात आलेला नाही. यंदाही १२ डिसेंबरला मुंबई पोलिसांनी ‘मुंबई मेरिटाईम बोर्डा’ला पत्र लिहून खासगी पाटर्य़ाना परवानगी देऊ नये असे कळविले आहे. त्यामुळे, यंदाही क्रूझवर खासगी पाटर्य़ा होणार नाहीत, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.