घरबांधणीसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून निलंबित असलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र मोरये यांच्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एका ठेकेदाराने हरेश्वर पाटील या इसमाचे घर बांधण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप मोरये यांच्यावर केला होता. परंतु माझी कुठलीच जागा नाही, मी कुठलेही घरबांधणीचे कंत्राट दिलेच नाही, असा दावा खुद्द हरेश्वर पाटील यांनीच केला आहे. माझ्या नावाने खोटे करारपत्र करून ही तक्रार करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. आम्ही फक्त लाच मागितल्याचे तपासतो आणि कारवाई करतो, असे लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर २०१४ मध्ये अल्ताफ खान नावाच्या ठेकेदाराने लाचलुतपत खात्याकडे एक तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार त्यांना वर्सोवा येथे हरेश्वर पाटील नावाच्या इसमाने घरबांधणीचे कंत्राट दिले होते. या कंत्राटाचे करारपत्रही त्याने लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याकडे सादर केले आहे. हे घरबांधणीचे काम करण्यासाठी वर्सोवाचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र मोरये यांनी १ लाख २० हजार रुपयांची लाच आपल्या आणि सहकाऱ्यांसाठी मागितल्याची तक्रार खान यांनी केली होती. त्या तक्रारीनुसार मोरये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नुकतेच त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

ही बाब हरेश्वर पाटील यांना समजल्यानंतर ते पुढे आले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार बनावट असल्याचा दावा केला आहे. मी कुठल्याही अल्ताफ खान नावाच्या इसमाला ओळखत नाही, असे सांगून माझ्याकडे जागाच नाही तर घर बांधणार कुठून असा सवालही त्यांनी केला. मी कुठलेही करारपत्र केले नसल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी माझ्या नावाने कुणीतरी बोगस करारपत्र केल्याचे सांगत त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र करारपत्र दाखविल्याशिवाय ते खोटे की खरे हे सिद्ध होणार नाही आणि गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. हे करारपत्र मिळविण्यासाठी त्यांनी लाचलुचपत खात्याकडे माहिती मागविली. मात्र ते करारपत्र तपासाचा भाग असल्याने देऊ शकत नाही, असे खात्याने सांगितले. माझ्या नावाचा गैरवापर करून ही तक्रार केल्याचा आरोप मासेमारीचा व्यवसाय असलेल्या पाटील यांनी केला आहे.

निलंबित पोलीस निरीक्षक सुरेंद्र मोरये यांनीसुद्धा आपल्याविरुद्ध हे षड्यंत्र असल्याचे सांगितले. अल्ताफ खान मला भेटला होता. त्याने एका बांधकामासाठी पोलीस ठाणे पैसे मागत असल्याचे सांगून मदत मागितली होती. त्याला मी मदतीचे आश्वासन दिले होते. परंतु मलाच लाच मागितल्याप्रकरणी अडकविल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसेवकाने लाच मागितल्याचे तपासता, पण तक्रारीची शहानिशा केली असती तर अनेक गोष्टींवर प्रकाश पडला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वेदपाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोरये यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मोरये यांनी लाच मागितल्याचे पुरावे आहेत आणि लाच मागितल्याची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले. कुठल्या कामासाठी लाच मागितली, तो प्रकार अस्तित्वात आहे की नाही, हे आम्ही तपासत नाही. आम्ही फक्त लोकसेवकाने लाच मागितली का तेच बघतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘खोटय़ा तक्रारी रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रण’

अनेकदा फिर्यादी तक्रारी दिल्यानंतर नंतर मागे फिरतात. काही वेळा आरोपी त्यांच्यावर दबाव टाकतात. त्यासाठी आम्ही त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून जबाब नोंदवून घेत असतो. ते पुरावे पुढे न्यायालयात उपयोगी पडतात, असे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. सुरेंद्र मोरये यांच्या प्रकरणातील सत्यता तपासाअंती स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.