जे जिल्ह्य़ात कधी येत नाहीत, फिरत नाही, बैठका घेत नाहीत तेच माझ्यावर टीका करतात, काम करतो तोच चुकतो, त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाहीत असे स्पष्ट करून पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री राजकारण करतात म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.
दुष्काळाच्या कामात कसलेही राजकारण केलेले नाही, करणार नाही. १५० कोटी रूपयांची कामे नरेगातून जिल्ह्य़ात झाली, सर्व आमदार, खासदारांच्या निधीच्या कितीतरी पट ही कामे आहेत. नियोजन केले म्हणूनच ती झाली. दुष्काळ निवारणासाठी सरकारने जे २० निर्णय घेतले त्यातील तब्बल १८ निर्णय हे नगरच्या विषयांवरून झालेले आहे. काम करत नसलो असतो, त्यात राजकारण आणले असते तर हे शक्य झाले असते का असा सवाल पाचपुते यांनी केला.
ज्यांनी मागीतली त्यांना छावणी दिली. त्यातही कोणी पक्षीय भेद आणत असतील तर ते योग्य नाही. पाण्याच्या टंचाईमुळे ज्यांच्या बागा जळून चालल्या आहेत, त्यांच्यासाठी टँकरने पाणी आणून झाडे वाचवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला होता. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यात लक्ष घातले. त्यामुळे सुमारे ६४ कोटी रूपयांचा हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतीम टप्प्यात आहे. त्यातून बागा वाचतील अशी माहिती पाचपुते यांनी दिली व हे काम नाही का असे विचारले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नगर निवास कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाचपुते यांनी टंचाई निवारणाचे काम जिल्ह्य़ात व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. माजी आमदार दादा कळमकर व  रोजगार हमी योजना व टंचाई निवारण विभागाचे उपजिल्हाधिकारी अनुक्रमे गोरक्ष गाडीलकर व राहूल पाटील यावेळी उपस्थित होते. छावण्यांमध्ये साधारण २ लाख जनावरे आहेत. ३०० छावण्या सुरू आहेत. त्यात एका छावणीत साधारण २०० माणसे जनावरांसोबत असल्याने रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या कमी दिसते आहे असे पाचपुते म्हणाले.
चारा तसेच पाण्याचे व्यवस्थित नियोजन केलेले आहे. छावण्यांसाठीचे पैसे वाढवून देण्याचा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवला आहे. यावर सकारात्मक काही होण्याचे संकेत पाचपुते यांनी दिले. छावण्या आहेत म्हणून जिल्ह्य़ाच्या दुध संकलनात विशेष घट झालेली नाही, त्यातही अनेक शेतकरी गुंतले आहेत. त्यामुळेही कदाचीत रोजगार हमी वर येण्यास कोणी तयार नाही, मात्र तरीही १ हजार १६ कामांवर सुमारे २१ हजार मजूर आहेत अशी माहिती यावेळी पाचपुते यांनी दिली.
सहकारी संस्थांना विशेषत: साखर कारखान्यांना दुष्काळ निवारणासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते, मात्र त्याकडे कोणी लक्ष दिलेले नाही असे पाचपुते यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी आता त्यांच्याकडून टनामागे विशिष्ट रक्कम कपात करून ती मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात येणार असल्यामुळे बहुधा साखर कारखान्यांची मदत थांबवली असावी असे सांगितले. तरीही अन्य सहकारी संस्थांनी तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी पाण्याच्या साठवण टाक्या द्याव्यात किंवा त्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन पाचपुते यांनी केले.