महावितरणच्या बेलापूर येथील वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने आठ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून ही गावे ऐन गणेशोत्सवात अंधारात आहेत. या गावांना अवघा दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. दुरुस्तीनंतर गुरुवारपासून वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
महावितरणच्या बेलापूर वीज उपकेंद्राची उभारणी १९७९ मध्ये करण्यात आली. तालुक्यातील हे विजेचे पहिले उपकेंद्र आहे. मुळा प्रवरा वीज संस्था व महावितरण यांच्या वादात या केंद्राची दुरुस्ती झाली नव्हती. तसेच क्षमताही वाढविण्यात आली नव्हती. दोन वर्षांपूर्वी महावितरणकडे संस्थेचे कार्यक्षेत्र आल्यानंतर बेलापूर उपकेंद्राच्या दुरुस्तीचे किरकोळ काम झाले. दोन दिवसांपूर्वी पाच मेगावॉट क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला, त्यामुळे उक्कलगाव, बेलापूर, रामगड, वळदगाव, उंबरगाव, पढेगाव, कान्हेगाव, मालुंजा, चांदेगाव, एकलहरे आदी आठ गावांतील वीजपुरवठा बंद पडला होता. आता पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून उमरगा येथून महावितरणने एक पॉवर ट्रान्स्फॉर्मर मागवला आहे. सोमवारी तो बेलापूरला येईल. त्यानंतर गुरुवारपासून वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.
बेलापूर गावाला अन्य केंद्रातून वीजपुरवठा सुरू केला आहे. बहुतेक गावात दोन ते तीन तास दररोज वीजपुरवठा केला जात आहे. मातापूर, सूतगिरणी, भोकर आदी उपकेंद्रांतून हा वीजपुरवठा केला जात असल्याचे सहायक अभियंता दिलीप पाटील यांनी सांगितले.
बेलापूर उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावात गावठाण क्षेत्राला स्वतंत्र वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आता अहोरात्र वीज देण्यास प्रारंभ झाला होता, पण उपकेंद्रातील बिघाडामुळे दोन ते तीन तासच वीज दिली जाते. गावठाण स्वतंत्र करण्याच्या योजनेत दुय्यम दर्जाची यंत्रणा बसवल्यामुळे बेलापूर उपकेंद्रात बिघाड होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण कार्यकारी अभियंता शिवाजी सांगळे यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीमुळे हा बिघाड झाला असला तरी येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण दाबाने वीजपुरवठा केला जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे  आवाहन सांगळे यांनी केले आहे.