30 September 2020

News Flash

नवी मुंबई पोलीस आयुक्त शर्मा यांची कुठेही नियुक्ती नाही

सुनील लोहारिया खून प्रकरणातील आरोपी सुरेश बिजलानी आणि अनुराग गर्ग यांच्या बरोबर असलेली जवळीक, नवी मुंबई पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांना चांगलीच नडली असून, गृह

| February 18, 2014 08:31 am

असंगाशी संग केल्याचा परिणाम
सुनील लोहारिया खून प्रकरणातील आरोपी सुरेश बिजलानी आणि अनुराग गर्ग यांच्या बरोबर असलेली जवळीक, नवी मुंबई पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांना चांगलीच नडली असून, गृह विभागाने रविवारी केलेल्या घाऊक बदल्यांमध्ये शर्मा यांचीही उचलबांगडी केली आहे. शर्मा यांना केवळ एक वर्ष आठ महिन्यांचा कालावधी लाभला असून, जून महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र त्यांची आतापर्यंत कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे केवळ चार महिने शिल्लक राहिलेल्या उच्च अधिकाऱ्याची अशाप्रकारे बदली केल्याचे यापूर्वीचे संकेत नाहीत.
गेल्यावर्षी याच महिन्यात सुनील कुमार लोहारिया या वाशीतील बिल्डरची त्याच्या सेक्टर २८ मधील कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावेळी कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सीसी टीव्हीमुळे या हत्येतील प्रमुख आरोपी राजू शेट्टीयार २४ तासांत नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ठाणे, मुंब्रा येथून पाच आरोपींना अटक केली होती.
यात एक माजी पोलीस निरीक्षक सॅम्युयल अमोलिक याचाही समावेश होता. या सर्व आरोपींची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या हत्येमागे नवी मुंबईतील बिल्डर सुनील बिजलानी आणि वास्तुविशारद अनुराग गर्ग यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे पोलिसांनी अनेक माहिन्यांनंतर बिजलानी याला अटक केली, पण गर्ग आजही फरारी घोषित करण्यात आला आहे. या दोन आरोपींचे पोलीस आयुक्त शर्मा यांच्याबरोबर खूप मोठय़ा प्रमाणात मोबाइल संभाषण असल्याचा पुरावा पोलिसांकडे आहे. शर्मा यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे मारले आहेत. तेव्हापासून शर्मा संशयाच्या पिंजरात उभे असून, त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार लटकत होती.
ही बदली केव्हाही केली जाणार होती, पण पोलिसांच्या बदल्यांचा घोळ सुरू असल्याने एकच बदली न करता गृह विभागाने केलेल्या ६८ बदल्यांमध्ये अप्पर महासंचालकाचे पद असणाऱ्या या वादग्रस्त नवी मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करून त्यांच्या जागी राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त के. एल. प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नागपूरचे आयुक्त के. के. पाठक यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण ऐनवेळी प्रसाद यांनी बाजी मारली.
मुंबईत पोलीस उपायुक्त (गुन्हे) असताना प्रसाद यांनी फार चमकदार कामगिरी केल्याची नोंद नाही. सर्व राजकीय मंडळींशी सलोख्याचे संबंध ठेवणारे प्रसाद यांचा ‘कृपाप्रसाद’ यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांना मिळणार, ते येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:31 am

Web Title: no pramotion to navi mumbai police commissioner
Next Stories
1 लोक बिरादरी प्रकल्पासाठी‘द्वंद्व’चा विक्रम!
2 ‘एमजीएम’समोर विद्यार्थ्यांचे धरणे
3 नवी मुंबई पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प
Just Now!
X