शंभर वर्षांनंतर भारतीय सिनेसृष्टीत वर्षांकाठी हजाराहून अधिक विविध भाषिक चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. या उद्योगाची सध्याची आर्थिक उलाढाल वर्षांकोठी ११२.४ अब्ज डॉलरच्या पुढे आहे. जगातील सर्वाधिक चित्रपट तिकिटांची विक्री केला जाणारा देश म्हणून भारतीय सिनेसृष्टीची ओळख आहे. जूनमध्ये होणाऱ्या ‘मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या प्रसिद्धीचा भाग म्हणून या आठवडय़ात आयोजित कार्यक्रमात ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून विद्या बालनने हजेरी लावली. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, जूनमध्ये होणाऱ्या महोत्सवात भारतीय सिनेमाच्या शताब्दीपूर्तीची दखल घेत विविध भाषांमधील भारतीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याच महिन्यात होणाऱ्या फ्रान्सच्या ‘कान्न’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानेही याच कारणास्तव बॉलिवूडसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. तिथेही भारतीय चित्रपटांसाठी योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय, ब्रिटनमध्येही ‘व्हिसलिंग वुड्स’च्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमात अभिनेता जॅकी श्रॉफने हजेरी लावली होती. तर लंडनमध्येही बॉलिवुडच्या शतकी वाटचालीवर आधारित ‘कार्मेन’ हा ‘ऑपेरा शो’ होणार आहे. या सगळ्या गर्दीत आपल्याकडे या ऐतिहासिक दिवशी बॉलिवूडच्या वतीने ‘बॉम्बे टॉकीज’ नावाचा एकमेव चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. राज्य शासनातर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.