भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे स्थलांतर गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहत येथे करण्याचा कोणताही प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन नाही, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) असीम गुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
‘लोकसत्ता’च्या २४ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय’या बातमी संदर्भात गुप्ता यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण तसेच उच्च न्यायालय-मुंबई येथे दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक २८२५/२००४ दिनांक १८/७/२००५ मधील आदेशानुसार महापालिका प्रशासनाने हे उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
हा प्रकल्प मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५० कोटी रुपये इतका आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या पत्रानुसार प्राणी संग्रहालयाच्या पूर्व सीमेलगत असलेल्या मफतलाल गिरणीचे ७ एखर क्षेत्रही या प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी हस्तांतरित केले जाणार आहे.
या जागेचे प्राणी संग्रहालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर या जागेचा मांडणी आराखडा तयार करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही गुप्ता यांनी या पत्रकात म्हटले आहे.