वनखात्याला रेडिओ कॉलर मिळत नसल्याने चंद्रपुरातील चार जेरबंद बिबटे महिनाभरापासून पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबटय़ा व वाघाने दोन महिन्यात १२ गावकऱ्यांना ठार केले. वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने प्रचंड दबावात आलेल्या वन खात्याने मोहुर्ली, आगरझरी व मामला परिसरात पिंजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबटय़ांना मोहुर्ली येथे तर, एक बिबटय़ा रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून चार बिबट जेरबंद असून पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार झोडत आहेत.
या चारपैकी एक बिबट नरभक्षक आहे. मात्र, नरभक्षक बिबट कोणता, याचा शोध वनखात्याला अजूनही घेता आलेला नाही. त्यामुळे या चार बिबटय़ांना जंगलात सोडायचे की नाही, हे ठरविण्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक वन्यजीव मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबटय़ांचा अभ्यास करून यासंदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्लू.एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. मात्र, यासंदर्भातील अहवाल व निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे चार बिबट पिंजऱ्यात अडकून पडले आहे.
तसेच, या चारही बिबटय़ांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबट पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. चार बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावायचे म्हटले तर वनखात्याला १५ लाखांचा खर्च येणार आहे. हा खर्च करण्याची तयारीही वनखात्याने दाखविली आहे. मात्र, कॉलरचा तुटवडा असल्याने विलंब होत असल्याची माहिती वनखात्यातील सूत्रांनी दिली. बिबटय़ाला रेडिओ कॉलर व माईक्रोचिप लावून जंगलात सोडले तर त्याच्यावर लक्ष ठेवणे सहज सोपी जाते, तसेच बिबटय़ाने एखाद्यावर हल्ला केला तरी हा हल्ला कोणत्या बिबटय़ाने केला, याचीही माहिती वनखात्याला तात्काळ मिळते. त्यामुळेच बिबटय़ाला कॉलर लावून सोडावे, असा आग्रह वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यामुळे वनखाते आता कॉलरच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, तब्बल दीड महिन्यापासून बिबट पिंजऱ्यात जेरबंद असल्याने ते माणसाळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. एखाद्या बिबटय़ाने सलग काही महिने पिंजऱ्यात काढले तर त्याच्या शारीरिक हालचाली मंद होतात. यासोबतच त्याला जंगलात शिकारही करता येत नाही. त्याचे दात बोथट होऊन जातात. जंगलात त्याला पळता येत नाही. प्रसंगी एखादा कमकुवत प्राणीही बिबटय़ाची शिकार करू शकतो. त्यामुळे या चारही बिबटय़ांना तातडीने जंगलात सोडण्यात यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. आणखी काही महिने उशीर झाला तर चारही बिबटय़ांना कायमचे पिंजऱ्यात ठेवावे लागेल. या सर्व शक्यता लक्षात घेता वनखात्याने तातडीने रेडिओ कॉलर विकत घेऊन बिबटय़ांना जंगलात सोडावे. विशेष म्हणजे, जेरबंद चार बिबटय़ांपैकी एक बिबट तर दीड वर्षांंपासून मोहुर्लीच्या प्राणी बचाव केंद्रात वास्तव्याला आहे. आज सोडू उद्या सोडू, म्हणता म्हणता दीड वषार्ंपासून पिंजऱ्यात अडकून असलेला हा बिबट आता पूर्णत: माणसाळलेला आहे. त्यामुळे या बिबटय़ाला जंगलात सोडले तर त्याला वन्यप्राणी ठार करतील, अशी भीती अधिकारीच व्यक्त करत आहेत. त्यामुळे चारपैकी केवळ तीन बिबट जंगलात सोडण्यात येतील, अशीही माहिती वनखात्यातील सूत्रांनी दिली. सध्यातरी वनखात्याने रेडिओ कॉलर तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.