मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अचानकपणे पावसाने दडी मारल्याने शेती जगविण्यासाठी उरणमधील शेतकऱ्यांना द्राविडीप्राणायाम करावे लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका नागावमधील शेतकऱ्यांना बसला आहे. येथील शेतकऱ्यांची पिके करपू लागल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना नाल्यातील दूषित पाण्याचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
डोंगर परिसरातून येणारे नैसर्गिक नाले, ओढे यामुळे नागाव येथील शेतकरी आनंदाने शेती करीत आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच निम्मा जुलै महिना कोरडा गेल्याने आणि पिकाच्या महत्त्वाच्या वेळेत पाऊस नसल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी शेतातील पीक करपू लागले आहे. या पिकाला जगविण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी घाणीने भरलेल्या नाल्यातील पाणी अडवून ते पाणी शेताकडे वळवून शेतीला देण्याचा प्रयत्न चालविला आहे.  पावसाने दडी मारल्याने अशाच प्रकारची परिस्थिती उरण तालुक्यातील पूर्व विभागावरही ओढवली आहे. येथील खाऱ्या जमिनीतील भातपिके रखरखत्या उन्हामुळे नष्ट होऊ लागली आहेत. पाण्याची कोणतीही सोय नसल्याने अनेक ठिकाणी उसने पाणी देऊन पिके जगविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाची काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास यावर्षीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता असल्याचे मत गोवठणे येथील शेतकरी रामचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.