नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांत सगळीकडे विविध रंगांची उधळण दिसत असली आणि त्या त्या वारी विशिष्ट रंगांचे कपडे परिधान केले जात असले तरी रंगांनुसार वस्त्रे परिधान करण्याला कोणताही धार्मिक आधार नाही, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले. मात्र एकाच रंगांचे कपडे परिधान केल्यामुळे या दिवसांत सर्वत्र समानता, आनंद आणि एकता दिसून येते. त्यामुळे याला सामाजिक व सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्व असल्याचेही सोमण म्हणाले. नवत्रौत्सवाच्या नऊ दिवसातील हे रंग वारांनुसार ठरविले जातात. ग्रहांवरून वारांची नावे आली असून पंचांगामध्ये ग्रह, त्याचा रंग आणि कोणत्या ग्रहासाठी कोणते दान हे सांगितले आहे. शास्त्रात गरीब आणि गरजू व्यक्तींना वस्त्रदान करण्यास सांगितले असल्याचे सोमण म्हणाले. यंदा नवरात्र गुरुवारपासून सुरू झाले आहे. गुरु ग्रहासाठी पिवळा रंग सांगितला आहे. त्यानुसार रवी ग्रहासाठी (रविवार) केशरी, चंद्रासाठी (सोमवार) पांढरा, मंगळासाठी (मंगळवार) लाल, बुधासाठी (बुधवार) निळा, शुक्रासाठी (शुक्रवार) चित्रविचित्र आणि शनीसाठी (शनिवार) काळा रंग सांगण्यात आला आहे. पण काळा रंग आपण अशुभ मानत असल्याने त्याऐवजी करडय़ा रंगांचे वस्त्र दान करावे.
त्यामुळे रंगांनुसार कपडे परिधान करण्याला धार्मिक आधार नाहीच; पण त्याला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्व नाही. या रंगांचे कपडे परिधान केले तर देवीची कृपा आणि केले नाहीत तर देवीचा कोप होईल, यालाही कोणताच आधार नाही. तसेच रंगांनुसार कपडे परिधान केलेच पाहिजेत, असे बंधनही नसल्याचे सोमण यांनी सांगितले.