घरांचे भाव गगनाला भिडलेले असतानाही दसरा-दिवाळीत घरांच्या खरेदीला जोर चढतो. परंतु घरखरेदीला दसऱ्यापासून लागलेली नाट कमी न झाल्याचा अनुभव यंदा ऐन दिवाळीतही विकासकांना घ्यावा लागला. आता थेट गुढीपाडवा आणि २०१४ मधील निवडणुका होईपर्यंत परिस्थिती अशीच राहील, अशी धास्ती विकासकांना वाटत आहे. ग्राहकांना भरघोस सवलती देऊनही त्यांनी पाठ फिरविल्यामुळे विकासक भलतेच धास्तावले आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील अनेक नामवंत विकासकांनी आपले प्रकल्प कार्यान्वित केले. परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत काही प्रकल्पांकडे ग्राहक नुसतेच चौकशीसाठी फिरकले तर काही ठिकाणी जेमतेम १० ते २० टक्के ग्राहकांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. अनेक बिल्डरांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पहिल्या येणाऱ्यांना सवलती देऊ केल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असेही आढळून आले. अनेक बडय़ा बिल्डरांनी नोंदणीसाठी सुरुवातीला ७० टक्के रक्कम भरणाऱ्यांना प्रति चौरस फुटाच्या दरात चांगली कपात देण्याचेही कबूल केले. परंतु अखेरीस ही रक्कम २० ते ४० टक्के इतकी खाली आणल्यानंतर नोंदणी झाल्याचेही सांगण्यात आले.
गेल्या दिवाळीपेक्षा यंदाची दिवाळी खूपच थंड गेली, असे बऱ्याच विकासकांचे म्हणणे आहे. परंतु व्यावसायिक संबंध लक्षात घेता यापैकी कोणीही थेट बोलण्याचे टाळत होते. मात्र ‘देव लँड अँड हाऊसिंग प्रा. लि’चे (डीएलएच) कार्यकारी संचालक श्रीनिवास यांनी नोंदणीसाठीही फारसे ग्राहक फिरकले नाहीत, हे मान्य केले. दिवाळीच्या निमित्ताने आम्हीही नव्या प्रकल्पांसाठी घर नोंदणीची घोषणा केली. परंतु यंदा खूपच थंड प्रतिसाद आढळून आला, असेही त्यांनी सांगितले.
‘देशमुख बिल्डर्स प्रा. लि.’चे प्रमुख मोहन देशमुख यांनी सध्या घरखरेदी खूपच थंडावल्याचे मान्य केले. एक कोटीहून अधिक किमतीच्या पुढील घरांची खरेदी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुंबईबाहेरील प्रकल्पांना सामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिंडोशी येथे ओमकार रिएलिटीमार्फत १२०० घरांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा केली तेव्हा ८० टक्के प्रतिसाद मिळाला. यंदा दिवाळीत एका टॉवरची घोषणा केली तेव्हा मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे ओमकार रिएलिटीचे मुख्य विपणन अधिकारी भरत धुपट यांनी सांगितले. ‘गोदरेज प्रॉपर्टीज’च्या चेंबूर आणि विक्रोळी तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील व्यापारी प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष (विपणन आणि विक्री) गिरीश शाह यांनी केला आहे. मात्र नेमका किती प्रतिसाद मिळाला, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
बिल्डरनी दिलेली आमिषे
* प्रति चौरस फुटाच्या दरावर १० ते २० टक्के कपात
* मोफत मुद्रांक शुल्क नोंदणी
* क्लब हाऊसचे मोफत सदस्यत्व
* मोफत कार किंवा मोडय़ुलर किचन
* एकदम पैसे भरल्यास ५० लाखापर्यंत रोकड परत