येथे पातडिया मदानावर आयोजित केलेले जिल्हास्तरीय प्रदर्शन नाममात्रच ठरले. कार्यक्रमपत्रिकेवर उल्लेख असलेल्यांपैकी जि. प. उपाध्यक्ष वगळता इतर लोकप्रतिनिधींनी मात्र या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली. ज्या महिला बचतगटांनी स्टॉल उभारले, त्यावरील मालविक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बचतगटांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे दरवर्षी कयाधू जिल्हास्तरीय प्रदर्शन व वस्तूंची विक्री जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. यंदा प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष उद्धव गायकवाड यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली झाले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, प्रकल्प संचालक डॉ. ए. बी. लोणे यांची उपस्थिती होती.
निमंत्रणपत्रिकेवर उद्घाटक म्हणून खासदार सुभाष वानखेडे, अध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे, तर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार राजीव सातव, भाऊ पाटील गोरेगावकर व जयप्रकाश दांडेगावकर यांचा समावेश होता. परंतु गायकवाड वगळता इतरांनी पाठ फिरवली.
प्रदर्शनात ९७ स्टॉल्सची नोंद झाली, मात्र बहुतेक स्टॉलवर दोन दिवसांत जेमतेम १०० ते ३०० रुपयांपर्यंत मालाची विक्री झाली. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या या उक्तीप्रमाणे हे प्रदर्शन ठरल्याची प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी व्यक्त केली. प्रदर्शन चार दिवस चालणार असून, ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून यावर तीन-चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, प्रदर्शनाकडे लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. उद्या (शनिवारी) प्रदर्शनाचा समारोप आहे.